Sat, Apr 20, 2019 08:13होमपेज › Sangli › छोट्या बाबरसह टोळीवर ‘मोका’अंतर्गत कारवाई

छोट्या बाबरसह टोळीवर ‘मोका’अंतर्गत कारवाई

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:52AM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

सराईत गुंड विक्रांत ऊर्फ छोट्या शंकर बाबर याच्यासह नऊ जणांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज मंजुरी दिली. ही माहिती अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राहुल रमेश बाबर, रोहित बाबर, मेघश्याम ऊर्फ मोठ्या अशोक जाधव, घनश्याम ऊर्फ बारक्या अशोक जाधव, शेखर माने, विनायक ऊर्फ  विनू यशवंत निकम, धनंजय ऊर्फ धना शैलेश भोसले, ओंकार जाधव यांचा कारवाई झालेल्यात समावेश आहे.
 त्यांच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गर्दी -मारामारी, खंडणी, दरोडा टाकणे, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

बोराटे यांनी दिलेली  माहिती अशी ः किरण रुपेश भंडारे (वय 20, रा. रमामातानगर  याचा रोहित बाबर आणि संतोष जाधव यांच्याशी वाद झाला होता. त्यातून बाबरने किरणला जीवे मारण्याची धमकी दिली होती.   दि. 4 डिसेंबर रोजी किरण भंडार त्याचा मामा विकी कांबळे, राजू सोनवणे यांच्यासोबत पाकिजा मशिदीजवळ गेले होते. त्या ठिकाणी दोन दुचाकी आणि एका पांढर्‍या रंगाच्या चार चाकी गाडीतून काही लोक आले. त्यांच्या हातात कोयता, लोखंडी गज, दांडकी होती. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील दुकाने बंद झाली. 

किरण,  राहुल आणि त्याचा मामा पळून जात असताना रोहित बाबरने त्यांना अडवले. शिवीगाळ करीत अपशब्द वापरले. किरणवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातून राहुल आणि त्याचे साथीदार भांडण सोडवण्यास गेले असता त्यांच्यावरच गज आणि दांडक्याने हल्ला केला. लाथा बुक्क्याने मारहाण केली.  ओंकार जाधवने विकी कांबळे याच्यावर हल्ला केला. रिक्षाची तोडफोड केली. त्यानंतर किरणला तातडीने उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार छोट्याबाबरसह त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. छोट्या बाबरने जीवे मारण्याची धमकी दिल्याची साक्ष कपील शिंदे आणि निहाल खलीफा यांनी दिली. त्यानुसार या टोळी विरोधात मोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव  पाठवण्यात आला होता. त्याला नांगरे- पाटील यांनी आज मंजुरी दिली. 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे राजन माने, पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके आदिंनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस उपाअधिक्षक किशोर काळे अधिक तपास करीत आहेत.