Sat, Mar 23, 2019 16:14होमपेज › Sangli › पोषण आहार तांदूळ, डाळींच्या वजनात गोलमाल

पोषण आहार तांदूळ, डाळींच्या वजनात गोलमाल

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 12:57AMसांगली : प्रतिनिधी

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवठादाराकडून पुरवठा होणार्‍या  तांदूळ, डाळींच्या वजनात ‘गोलमाल’  होत असल्याच्या तक्रार वाढू लागल्या आहेत. पन्नास किलोच्या पोत्यात चार ते सहा किलो तांदूळ कमी असतो. ताणकाट्यावर अचूक वजन होत नसल्याने  मुख्याध्यापकांवरील ताण  वाढू लागला आहे.  तांदूळ, डाळींचे वजन ताणकाट्यावर करून न देता इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यावर करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन शिक्षक भारती व जुनी पेन्शन हक्क संघटनेने दिले आहे. शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे, सरचिटणीस कृष्णा पोळ, कादर अत्तार, दीपक काळे, दिगंबर सावंत, शौकत नदाफ, पांडुरंग साठे, शहानवाज मणेर, भाऊसाहेब महानोर, संजय कांबळे, हाजी पठाण यांनी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांना निवेदन दिले. शालेय पोषण आहार पुरवठा करणार्‍या वाहनात ताणकाटा असतो.

त्याद्वारे तांदूळ व धान्यादी मालाचे वजन योग्य प्रकारे होत नाही. इलेक्टॉनिक्स वजन काट्यावर वजन करून मिळावे. दरम्यान, परीविक्षाधीन कालावधी, स्थायी प्रमाणपत्र, वरिष्ठ वेतनश्रेणी, मराठी, हिंदी सूट, मेडिकल बिल प्राप्त प्रस्ताव मंजूर व्हावेत, अशी मागणीही केली.  भरारी पथकांद्वारे तपासणी करा ः शिंदे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांना निवेदन दिले. धान्यादी माल, तांदूळ पुरवठा करणार्‍या ठेकेदारांच्या वाहनात इलेक्ट्रॉनिक वजन काटे बंधनकारक करावे. वजनात तफावत आढळत असल्याने निष्कारण मुख्याध्यापक अडचणीत येत आहेत. धान्य पुरवठा करणार्‍या वाहनांची भरारी पथकांद्वारे तपासणी करावी. ऑनलाईन कामावर बहिष्कार असल्याने पोषण आहाराची देयके ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.