Mon, Aug 19, 2019 18:25होमपेज › Sangli › सांगली : चार लाखांची रोकड लंपास

सांगली : चार लाखांची रोकड लंपास

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 12:09AMसांगली ः प्रतिनिधी

शहरातील त्रिकोणी बागेजवळ झालेला किरकोळ अपघात पाहण्यासाठी गेलेल्याच्या मोपेडला लावलेली चार लाखांची रोकड असलेली बॅग लंपास करण्यात आली. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत उमाकांत माधव माळी (वय 46, रा. वॉन्लेसवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. माळी यांचा शेती औषधे निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे विश्रामबाग आणि बसस्थानक परिसरात अशी दोन औषध विक्रीची दुकाने आहेत. सोमवारी रात्री बसस्थानक परिसरातील दुकानात जमा झालेले चार लाख रुपये त्यांनी बॅगेत भरले. ती रोकड असलेली बॅग त्यांनी त्यांच्या मोपेडला (एमएच 10 बीक्यू 6255) अडकवली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून आंबेडकर रस्त्याने ते घरी निघाले होते. 

त्रिकोणी बागेजवळ आल्यानंतर दोन दुचाकींचा किरकोळ अपघात झाला होता. त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी जमली होती. तेथे काय झाले आहे ते पाहण्यासाठी माळी मोपेड रस्त्याकडेला उभी करून गेले होते. तेथून परत आल्यानंतर रोकड असणारी बॅग लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला मात्र बॅग सापडली नाही. त्यांनी मंगळवारी याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.