Mon, Apr 22, 2019 16:33होमपेज › Sangli › आरक्षणे उठविण्यासाठी मनपावर मोर्चे

आरक्षणे उठविण्यासाठी मनपावर मोर्चे (व्हिडिओ)

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 8:31AMसांगली ः प्रतिनिधी

लोकवस्तीत असलेली आरक्षणे उठविण्याचा ठराव महासभेत करावा, या मागणीसाठी आरक्षण बाधित नागरिकांनी शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढून दिवसभर ठिय्या मारला. महासभेत आरक्षण उठविण्याचा ठराव केल्याची ग्वाही महापौर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवकांनी दिल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.   प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व्हे नंबर 302/अ वर ट्रक पार्किंग, प्रभाग 3 मधील सुभाषनगर, अयोध्यानगर, निरंकार कॉलनी, जगदाळे प्लॉट, पाटणे प्लॉट, आदगोंडा पाटीलनगर या परिसरात तीस वर्षांपासून लोकवस्ती आहे. तेथे क्रीडांगण, शाळा, गार्डन, भाजी मंडईचे आरक्षण कायम आहे. ते उठवावे अशी मागणी होती.

त्यानुसार ही आरक्षणे उठविण्याचा महासभेत आला होता. या परिसरातील नागरिकांनी पालिकेवर शुक्रवारी मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व माजी महापौर कांचन कांबळे, संजय कांबळे, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, नगरसेवक विष्णू माने, मनगुआबा सरगर, रोहिणी पाटील, स्नेहा औंधकर यांनी केले. नागरिकांनी  अधिकार्‍यांना निवेदन दिले. तर नगरसेवकांकडे आरक्षण उठविण्याचा ठराव करावा, अशी मागणी करत पुष्पगुच्छ दिले.
महासभेत लोकवस्तीतील आरक्षणे उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापौर हारूण शिकलगार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर विवेक कांबळे, सुरेश आवटी व गौतम पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली.  महापौर शिकलगार यांनी आरक्षणे उठविण्याचा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. यामुळे नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. या आंदोलनात संजय कांबळे, आनंदा लेंगरे, सचिन सरगर, श्रीकांत साठे, सागर कोळेकर, दादासाहेब शिंदे, राजू पडळकर, लक्ष्मण हिप्परकर, युवराज कांबळे सहभागी झाले होते.