Sun, May 26, 2019 21:12होमपेज › Sangli › आरपीआयचा सोमवारी सांगलीत मोर्चा

आरपीआयचा सोमवारी सांगलीत मोर्चा

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:30AM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

भीमा- कोरेगाव दंगलीतील दंगलखोर आरोपींना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक करावी. धर्मवेडाच्या नावे तरुणांची डोकी भडकवून जातीय फूट पाडणार्‍यांना रोखावे, या मागणीसाठी आरपीआयच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.  हा लढा आरोपींवर कारवाईसाठी इशारा आहे, असे मत माजी महापौर विवेक कांबळे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले. सकाळी 10 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून हा मोर्चा निघणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, भीमा-कोरेगाव दंगलीनंतर सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे. यामागे कोणत्या शक्ती आहेत हे उघड आहे. वास्तविक दंगलीतील आरोपींचे समर्थन करण्यासाठी जो मोर्चा काढला तो अठरापगड जातींचा असल्याचे सांगण्यात आले. पण ज्या संघटनेचे संस्थापक आहेत त्यांचा पूर्वइतिहास तपासावा. गोरगरीब, सामान्यांच्या मुलांना चुकीचा इतिहास सांगून डोकी भडकविण्याचे काम करणारी वृत्ती रोखली पाहिजे. स्वत:चे राजकीय व सामाजिक अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी हा त्यांचा उद्योग आहे. 

कांबळे म्हणाले, गुण्यागोविंदाने राहणार्‍या शहरांत जातीय तेढ निर्माण करण्याचा उद्योग त्यांनी पुन्हा सुरू केला आहे. वास्तविक यापूर्वी झालेल्या दंगलींशी त्यांचा संबंध उघड आहे. आताही त्यांचाच या दंगलीमागे सहभाग आहे, हे चौकशी करायला पोलिसांना वेळ का लागतो? ते न करता पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीच जर त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहत असतील तर कसली चौकशी आणि कसले काय?  ते म्हणाले, कसल्याही प्रकारे दंगाधोपा, तोडफोड आंदोलनाचे आम्ही समर्थन करीत नाही. पण अशी प्रवृत्ती रोखण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील. त्यासाठीच सोमवारी मोर्चा आहे. पुढे आणखी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत राहू. यावेळी स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, बाळासाहेब गोंधळे, अपर्णा वाघमारे, बापू सोनावणे, बापू ठोकळे, आशिष गाडे, सुनील साबळे, सर्जेराव गायकवाड, माणिक गस्ते, अशोक ठोकळे, संतोष वाघमारे आदी उपस्थित होते.