Sun, Feb 17, 2019 21:21होमपेज › Sangli › पोषण आहाराचे आठ महिन्यांचे अनुदान रखडले

पोषण आहाराचे आठ महिन्यांचे अनुदान रखडले

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 9:07PM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

अंगणवाड्यांमधील पोषण आहाराचे मे 2017 पासूनचे अनुदान शासनाकडून आलेले नाही. पुरवठादार महिला बचत गटांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, जिल्ह्यात अंगणवाडी दुरुस्ती व बांधकामासाठी 6 कोटी रुपयांचा आराखडा दोन दिवसात शासनाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली.  जिल्हा परिषदेत शुक्रवारी महिला व बालकल्याण समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नायकवडी होत्या. पोषक आहाराचे आठ महिन्यांचे अनुदान प्रलंबित आहे. अनुदानातील केंद्र शासनाचा हिस्सा 60 व राज्याचा हिस्सा 40 टक्के आहे. शासनाकडून अनुदान आले नाही. या अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे. 

शासनाकडून यापूर्वी केवळ अंगणवाडी इमारत बांधकामासाठी निधी मिळत होता. आता अंगणवाडी दुरुस्तीसाठीही निधी मिळणार आहे. शासन अनुदानातील 50 टक्के रक्कम अंगणवाडी दुरुस्तीसाठी व 50 टक्के रक्कम अंगणवाडी इमारत बांधकामासाठी मिळणार आहे. त्यासाठी 6 कोटींचा आराखडा पाठविला जाणार आहे, अशी माहिती डॉ. नायकवडी यांनी दिली. अंगणवाडी इमारत बांधकाम पूर्ण केलेल्या मक्तेदारांचे 3.15 कोटी रुपये रखडले आहेत. ‘डीपीसी’ऐवजी शासननिधीतून बांधकाम रक्कम दिली जाणार असल्याचे शासनस्तरावरून स्पष्ट केले होते. त्यामुळे निधी उपलब्ध असतानाही मिळू शकला नव्हता. मागील कामांसाठीचा निधी ‘डीपीसी’कडून मिळणार आहे.