Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Sangli ›

महापालिका निवडणुकीत भाजप घोडेबाजार करणार

महापालिका निवडणुकीत भाजप घोडेबाजार करणार

Published On: Apr 05 2018 2:11AM | Last Updated: Apr 05 2018 2:05AMसांगली : प्रतिनिधी

राज्यात नगरसेवक, आमदारांना फोडून भाजपने अनेक ठिकाणी घोडेबाजार केला आहे. सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपकडून घोडेबाजार होणार आहे. तेव्हा नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्रात सध्या परिवर्तनाची चाहूल दिसत आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीतून राज्यातील परिवर्तनाची सुरुवात करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. 

राष्ट्रवादीची हल्लाबोल सभा बुधवारी रात्री सांगलीत स्टेशन चौकात झाली.  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छाया पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, कमलाकर पाटील व नगरसेवक उपस्थित होते. 

पवार म्हणाले, कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना भरभक्कम रक्कम देऊन फोडले. घोडेबाजार करून भाजपचा सभापती केला. भाजपने राज ठाकरेच्या सहा आमदारांचे तोडपाणी प्रत्येकी 5 कोटींना केले. भाजपकडे कुठून एवढा पैसा आला. सांगली महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपकडून घोडेबाजार होणार आहे. जनतेने सावध रहावे. भावी पिढीचे नुकसान होईल असे जनतेने करू नये. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री, भाजपचे मंत्री सांगलीत येतील. हजार कोटी रुपयांच्या घोषणा करतील. पण दमडीही देणार नाहीत. सांगलीकरांनी भाजपच्या थापांना बळी  पडू नये. 

पवार म्हणाले, नरेंद्र मोदींच्या थापांना बळी पडून जनतेने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर आणले. पण आता येणार्‍या निवडणुकीत जनतेने शहाणे व्हावे. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजप थोडक्यात बचावली आहे. उत्तरप्रदेश, बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपचा पराभव अटळ आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चांगले उमेदवार देईल. सांगली महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जनतेने राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा. 
सरसकट कर्जमाफीपर्यंत गप्प नाही

पवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही. हे सरकार शेतकरीविरोधीआहे. शेतीमालाला दर नाही. महागाईने शहरी जनताही त्रस्त आहे. भाजपचे सरकार महाराष्ट्राला मागे नेणारे आहे. नोटाबंदीने काय साध्य केले? पाचशे, हजार रुपयांच्या 14 लाख कोटींच्या नोटा परत आल्या. किती काळा पैसा रोखला? किती नकली नोटा रोखल्या, असा सवालही पवार यांनी केला.

कोरेगाव-भीमा दंगलीने समाजात तेढ निर्माण केली. राज्य शासनाला ही दंगल वेळीच रोखता आली असती. पण त्यांनी ते केले नाही. भाजपला जाती-जातीत तेढ निर्माण करून राजकारण साधायचे आहे, असा आरोपही पवार यांनी केला. चंद्रकांत पाटील यांच्या भेट वस्तुंनी  सांगलीकर लाचार होणार नाहीत सुनील तटकरे म्हणाले, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील मतदारांना भेटवस्तू देणार आहेत. पण स्वाभीमानी सांगलीकर मतदार या भेटवस्तुंनी लाचार होणार नाहीत. जातीयवादी विचारांना गाडून सांगली महापालिकेत धर्मनिरपेक्ष शक्तींचा विजय होईल. महाराष्ट्रातील परिवर्तनाची सुरूवात सांगली महापालिकेच्या निवडणुकीतून करा. 

जयंत पाटील म्हणाले, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपकडून भेटवस्तुंचा सुळसुळाट होणार आहे. या भेटवस्तु स्विकारयच्या का नाही हे ज्याने-त्याने ठरवावे. पण महापालिका क्षेत्राच्या भवितव्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादीच्या पाठिशी रहावे. खोटे बोलणार्‍या, भूलथापाड्या भाजपला मतदारांनी जागा दाखवून द्यावी. भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षण देऊ असे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

मात्र 170  आठवडे झाले तरी धनगर आरक्षण दिले नाही. राज्य सरकारमधील 16 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी या सार्‍यांना क्‍लिन चिट देत पावन करून घेतले असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. राज्यात एकही मोठा उद्योग आला नाही. गुंतवणूक झाली नाही. रोजगार वाढले नाहीत. उलट बेरोजगारी वाढली आहे. केंद्र, राज्यातील सरकारच्या कारभाराने समाजातील सर्वच घटकांमध्ये असंतोष आहे. चित्रा वाघ, विष्णू माने, शेडजी मोहिते, ताजुद्दीन तांबोळी, महेश तपासे, प्रमोद हिंदूराव, छायाताई पाटील यांचे भाषण झाले.
 

 

 

tags ; Sangli,news,Sangli Municipal elections