Sun, Aug 25, 2019 23:27होमपेज › Sangli › निष्ठावंतांची ‘आर या पार’ लढाई

निष्ठावंतांची ‘आर या पार’ लढाई

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 21 2018 10:16PMसांगली : प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रं. 9 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीतील निष्ठावंतांनी ‘आर या पार’ लढाईचे रणशिंग फुंकत अपक्षांचे पॅनेल केले आहे. प्रचाराचा झंझावात सुरू आहे. घराणेशाही व मीपणाविरोधात कार्यकर्ते व मतदारांमध्ये मोठी नाराजी असून अपक्षांचा विजय निश्‍चित आहे, असा दावा अतुल माने यांनी केला आहे. 

संजयनगर, साईमंदिर परिसर, उत्कर्ष हडको कॉलनी, संजय कारागीर सोसायटी, प्रताप चौक, सहारा चौक, माळीवस्ती, अभयनगर आदी परिसरात अपक्ष उमेदवार अतुल माने, भूपाल (बंडू) सरगर, वृषाली पाटील, जन्नत कुरणे (मिरजे) यांनी शुक्रवारी पदयात्रा काढली. पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. अपक्षांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. राजेंद्र माने, सुशील हडदरे, इर्शाद पखाली, संजय खरात, मुबारक मौलवी, बशीर मुलाणी, गणेश बेवनूर, प्रल्हाद ढगे, लक्ष्मण आलासे, रविंद्र ढगे, इरफान मुल्ला व कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होते. 

काही प्रस्थापित गेली अनेक वर्षे या भागाचे महापालिकेत प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र समस्या, प्रश्‍न ‘जैसे थे’ आहेत. रस्ते, गुंठेवारी, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न इथल्या नागरिकांना कायमपणे सतावत आहे. या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे या प्रभागातील मतदार आता क्रियाशील उमेदवारांच्या पाठिशी उभे आहेत. परिवर्तन घडविण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. प्रस्थापितांना योग्य धडा मिळणार असून क्रियाशील कार्यकर्त्यांना महापालिकेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे, असे माने व सरगर यांनी सांगितले.  

काँग्रेस व राष्ट्रवादीशी अनेक वर्षे एकनिष्ठ असतानाही उमेदवारी नाकारली. त्याच त्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली. एकनिष्ठांना डावलल्यामुळे असंतोष आहे. मतदारही प्रस्थापितांच्या निष्क्रियतेविरोधात आहेत. त्यांना ‘हक्काचा नगरसेवक’ हवा आहे.  प्रभागात एकही बगीचा नाही. प्ले ग्राऊंड नाही. आरोग्य केंद्र नाही. व्यायामशाळा नाही, भाजीमंडई नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही. उच्चभ्रू वस्तीतील एकही सुविधा या प्रभागात नाही. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर मतदार अपक्षांच्या पाठिशी आहेत, असे माने यांनी सांगितले.