Sun, Jul 21, 2019 02:12होमपेज › Sangli › प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 30 2018 12:18AMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमुळे गेल्या महिन्यापासून तीनही शहरांत धडाडत असलेल्या राजकीय तोफा सोमवारी सायंकाळी पाच वाजता थंड होतील. दिवसभर सर्वच प्रभागांत सर्व पक्ष, अपक्षांतर्फे  प्रचार पदयात्रा, सभा होतील. 

 प्रचारगीते, पदयात्रा, व्यक्‍तिगत गाठीभेटी, जेवणावळी, हळदी-कुंकू समारंभ  या घटनांनी संपूर्ण महिनाभर तीनही शहरे व्यापून गेली होती. हा सर्व गदारोळही आज सायंकाळनंतर शांत होणार आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी गुप्त 
 प्रचार मात्र जोरात होईल अशी शक्यता आहे.  

महानगरपालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक दि. 1 ऑगस्ट रोजी होत आहे. एकूण 20 प्रभागात 541 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गेले वर्षभर इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू होती, पण प्रत्यक्ष प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या हालचालींना वेग आला. आचारसंहिता लागू झाल्यानंतर  निवडणुकीचे वातावरण खर्‍या अर्थाने तापले होते. 

गेल्या महिन्यापासून तर नागरिक प्रचारातील धडाका पाहत आहेत. भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादीतील आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गज मंत्री व नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता. काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, युवा नेते विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील  यांच्यासह दिग्गजांनी प्रचार केला.

राष्ट्रवादीतर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभांनी प्रचारात रंगत आणली. तर भाजपतर्फे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारसभा झाल्या. शिवसेनेतर्फे गजानन कीर्तीकर, नितीन बानुगडे-पाटील, रामदास कदम, अभिनेते आदेश बांदेकर यांच्या सभा झाल्या. जिल्हा सुधार समिती, पुरोगामी लोकशाही आघाडी, जनता दल ( धर्मनिरपेक्ष), आप यांच्यातर्फेही प्रचारसभा झाल्या. 

प्रचारसभेत विकासाच्या मुद्यांपेक्षा अनेक  व्यक्तिगत व पक्षीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने  भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजप आणि  शिवसेनेने आघाडीच्या महापालिकेतील कारभारावर सडकून टीका केली.