Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Sangli › महापालिकेतील ठेकेदारी, ठकशाही संपवा

महापालिकेतील ठेकेदारी, ठकशाही संपवा

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 10:29PMसांगली : चिंतामणी सहस्रबुद्धे 

महापालिका निवडणुकीत आयाराम-गयारामांना थारा देऊ नका, अशी मागणी भाजपच्या कोअर कमिटीच्या मिरजेत शनिवारी झालेल्या बैठकीत जोरदारपणे मांडण्यात आली. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनीही महापालिकेतील घोटाळेबाजांना भाजप थारा देणार नाही, असे लगेचच जाहीर केले. त्या आधी काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनीही काँग्रेसने स्वच्छ प्रतिमेच्या नवीन चेहर्‍यांना आता संधी दिली पाहिजे, अशी जोरदार मागणी केली होती. त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या तिकीटवाटपाकडे नागरिकांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

आजपर्यंतचा अनुभव असा आहे, की राजकीय पक्षांचे नेते जाहीरपणे भ्रष्टाचारावर टीका करतात. शहराच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगतात. त्यासाठी उत्साही, तरुण, सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, अशा घोषणा करतात. मात्र प्रत्यक्ष उमेदवारी वाटपाची वेळ आली, की नेहमीच्याच यशस्वींना उमेदवारी देतात. त्याचा परिणाम असा झाला आहे, की महापालिकेत कोणीही सत्तेवर असले तरी कारभारात काही फरक पडत नाही. पहिले पाढे पंचावन्न या न्यायाने निष्क्रीय, भ्रष्ट कारभार पुढे सुरू राहतो. 

तीनही शहरांचा त्यामुळे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत कोणताही विकास झालेला नाही. राज्यातील अन्य शहरे झपाट्याने विकसित झाली. तिथे नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या. रस्ते चांगले झाले. अनेक नवे उद्योग तिथे सुरू झाले. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, विमानसेवा सुरू झाली, मात्र या महापालिका क्षेत्राची पिछेहाटच सुरू असल्याचे  चित्र आहे. 

चांगले रस्ते, ड्रेनेजची सोय, कचरा उठाव अशा प्राथमिक सुविधांसाठीही नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. पंचवीस वर्षांपूर्वी सांगलीतून परगावी गेलेली एखादी व्यक्ती अचानक येथे आली, तर त्याला कोणताच विकासात्मक बदल झालेला दिसत नाही. उलट पहिल्यापेक्षा परिस्थिती अधिक बिकट झाल्याचा अनुभव येतो. 

या परिस्थितीला नेमके कोण जबाबदार आहेत, याचाही आता विचार झाला पाहिजे. राजकारणात सर्वत्रच घराणेशाही जोरात आहे. महापालिकेच्या राजकारणात तर ती लोणचे मुरल्यासारखी  मुरली आहे. एकाच घरातील दोन-तीन जण पक्षाकडे उमेदवारी मागतात. अशा मागणीचे पध्दतशीरपणे समर्थनही करतात. विधानसभा किंवा अन्य निवडणुकीत ते अन्य नेत्यांच्या घराणेशाहीवर टीका करतात, मात्र महापालिकेत मात्र त्यांना आपल्याच घरातील जास्तीत जास्त लोक हवे असतात. 

घराणेशाहीबरोबरच कंपूशाहीही प्रबळ आहे. ठराविक जण एकत्र येऊन निवडणुकीपूर्वी किंवा निवडून आल्यानंतर एक गट करतात. त्या गटाच्या एकजुटीपुढे नेतेही हार मानतात. हे गटच सगळी महापालिका चालवतात. मात्र ती चालवताना जनहिताचा विचार गौणच असतो. त्या कंपूंचाच विशाल पाटील यांनी ‘टोळी’ या शब्दात उल्लेख केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ही टोळी नेत्यांनाही जुमानत नाही. नेता कोणाही असो, महापालिकेच्या कारभाराची सुत्रे त्यांच्याकडेच असतात. महापालिकेत सत्ताबदल होऊनही कारभारात गुणात्मक बदल झाला नाही, तो या कारणामुळेच अशा निष्कर्षापर्यंत आता  जाणकार नेते आले आहेत. 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत या टोळ्या, कंपू किंवा घराणी पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. किंबहुना त्यांनी काम सुरूही केले आहे. राजकीय पक्षांना कोणत्याही निवडणुकीत विजय हवा असतो. त्यामुळे ते याच सराईत लोकांना जवळ करतात. निवडणुकीत त्यांना उमेदवारी देतात किंवा निवडून आल्यावर सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करतात. त्यामुळेच असे लोक शिरजोर झाले आहेत. त्यांना सत्तेशी मतलब असतो. लोकांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसते. त्यामुळेच गेल्या पंचवीस वर्षांत या तीनही शहरात नाव घेण्यासारखे एकही काम उभे राहिलेले नाही. 

कोट्यवधी रुपये खर्च होऊनही शेरीनाल्याचा प्रश्न सुटलेला नाही. गुंठेवारीतील रहिवाशांचे हाल कमी झालेले नाहीत. किमान पाच वर्षे टिकतील असे भक्कम रस्ते तयार झाल्याचा आजपर्यंतचा अनुभव नाही. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटलेली नाहीत. महापालिकेच्या खुल्या भूखंडांचा योग्य सार्वजनिक कामासाठी उपयोग झालेला नाही. पालिकेच्या दैनंदिन कारभाराला शिस्त नाही.  उलट नगरपालिका असताना चांगले असलेले दवाखाने किंवा अनेक शाळा आजमितीस अखेरच्या घटका मोजत आहेत.  रोजगाराच्या चांगली संधी मिळत नाही, म्हणून स्थलांतर करणार्‍यांचे प्रमाण कमी झालेले नाही. घरटी एकेक तरुण नोकरीच्या शोधासाठी महानगरांकडे निघून गेला आहे.  

जाहीर सभेतील भाषा वेगळी आणि प्रत्यक्षात व्यवहार वेगळा असा प्रकार जर प्रमुख राजकीय  नेत्यांनी नेहमीप्रमाणेच पुन्हा केला, तर नागरिकांना तो कितपत आवडेल याबद्दल शंका आहे. त्यामुळे उमेदवारी वाटप करताना केवळ ‘निवडून येण्याची क्षमता’ एवढाच निकष लावून चालणार नाही.    पालिकेचा कारभार खरोखरच लोकाभिमुख झाला पाहिजे, या तीनही शहरांच्या विकासाच्या दृष्टीने काही नियोजन झाले पाहिजे, असा दृष्टिकोन असणार्‍यांना उमेदवारी देणे अधिक महत्वाचे आहे. त्यावरच  महापालिकेच्या नूतन सभागृहाचे आणि तीनही शहरांचेही भवितव्य अवलंबून आहे.