Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Sangli › प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या

प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 12:16AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी शनिवारपासून सर्वपक्षीय प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन सभा घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कारभाराचा पंचनामा करीत जनतेला परिवर्तनाचे आवाहन केले.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन  भाजपचे वाभाडे काढले. अपक्षांनीही महाआघाडीद्वारे सर्वपक्षीयांना आव्हान दिले आहे. एकूणच आता रणांगण तापू लागले आहे.

महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, सांगली जिल्हा सुधार समिती, डावी आघाडी, तसेच आता नव्याने अपक्षांच्या महाआघाडीने उडी घेतली आहे. दि. 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 12) अर्ज छाननी झाल्यानंतर खर्‍या अर्थाने सर्वपक्षीय प्रचाराला सुरुवात झाली. प्रत्येक पक्षाने महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी जोरदार प्रचाराची तयारी सुरू केली आहे. 

ना. चंद्रकांत पाटील यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात प्रभागनिहाय उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मेळावे घेतले. यामध्ये नाराजांची समजूत काढण्याबरोबरच महापालिका निवडणुकीचीही व्यूहरचना सुरू केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पंचनामा केला. शहरातील दूषित पाणीपुरवठा, दुरवस्था सुधारण्यासाठी भाजपला सत्ता देण्याचे आवाहनही केले. रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सांगलीत सायंकाळी 6 वाजता प्रचाराची तोफ डागणार आहेत.

जयंत पाटील यांनीही आघाडीच्या प्रचाराचा पत्रकार बैठकीने  प्रारंभ केला. त्यांनी भाजपच्या केंद्र, राज्यातील कारभारावर तोफ डागली. सोबतच जनतेने उमेदवारीतच भाजपला नाकारल्याचा आरोप केला. नगरसेवकांची बैठक घेऊन आघाडीधर्माचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. काँग्रेसचे  पृथ्वीराज पाटील यांनीही भाजपवर तोफ डागली. महापालिका निवडणुकीत उघडपणे जनतेला आमिष दाखविली जात असल्याचा आरोप केला. उमेदवारीतच भाजप हरल्याचा आरोप पाटील यांनी केला. 

सर्वपक्षीयांकडून उमेदवारी नाकारलेल्या बंडखोरांनीही  महाआघाडी स्थापन करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्यांनीही आज पत्रकार बैठकीत सर्वपक्षीयांचा समाचार घेतला. यासाठी रविवारी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत अपक्ष महाआघाडी मेळावा घेणार आहे.