Wed, Jun 26, 2019 12:09होमपेज › Sangli › ‘हमीभावा’साठी हंगामा!

‘हमीभावा’साठी हंगामा!

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 8:47PMसांगली : सुनील कदम

महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असल्यामुळे माघारीसाठी आणि पाठिंब्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘अर्थकारण’ रंगलेले दिसत आहे. काही उमेदवारांनी तर जणूकाही आपला ‘हमीभाव’ ठरवूनच माघार आणि पाठिंब्यासाठी बोलणी चालू केल्याचे दिसत आहे. त्यासाठी लाखो रूपयांच्या बोली लावल्या जात असल्याची चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीसाठी एकूण 721 उमेदवार रिंगणात आहेत.   त्यापैकी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि स्वाभिमानी आघाडीचे मिळून जवळपास 236 उमेदवार आहेत. उर्वरित जवळपास 485 उमेदवार हे अपक्ष आहेत. या अपक्षांपैकी काही ठराविक उमेदवार सोडले तर अन्य अनेक उमेदवार हे हवशे, नवशे आणि गवशे स्वरूपात मोडणारे असल्याचे दिसते. यापैकी अनेक उमेदवार तर असे आहेत की, प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून आपापला ‘हमीभाव’ वसूल झाला की माघार घ्यायची किंवा एखाद्याला पाठिंबा जाहीर करायचा. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी केवळ दोन दिवस उरल्यामुळे अशा ‘विकावू’ उमेदवारांच्या उलाढाली जोमात असल्याचे दिसत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या मातब्बर पक्षांबरोबरच स्वाभिमानी आघाडीही मैदानात उतरली आहे. याशिवाय सर्व अपक्षांना एकत्र करून अपक्षांची आघाडी करण्याचेही प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांमध्ये काटा लढती बघायला मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाच-पन्नास मतेसुध्दा एखाद्या प्रभागातील जय-पराजय निश्‍चित करण्याला कारणीभूत ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील मातब्बर उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील अपक्ष उमेदवारांना साम, दाम, दंड, भेद नितीचा अवलंब करून  आपल्या बाजूला वळविण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे.

उमेदवारी माघारी आणि पाठिंब्यासाठी लाखो रुपयांच्या बोली लागल्याच्या दिसत आहेत. अगदी किरकोळात किरकोळ उमेदवारसुध्दा दहा-वीस लाखाच्या खाली आपला ‘हमीभाव’ लावायला तयार नाही. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काहीजणांनी आपणाला पक्षाची उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून प्रचारासाठी आणि मतदारांच्या सरबराईसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. मात्र ऐनवेळी त्यांच्या त्यांच्या पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे असे उमेदवार आता केलेला खर्च प्रतिस्पर्ध्याकडून वसूल करण्याच्या मागे लागलेले दिसत आहेत.

या कानाचे त्या कानाला कळू न देता काही बहाद्दर उमेदवार तर आपापल्या प्रभागातील एकापेक्षा अधिक मातब्बर उमेदवारांकडून आपली बोली लावून घेताना दिसत आहेत. एखादा अपक्ष उमेदवार नेमकी कुणाची मते खाणार, याचा अंदाज बांधूनही मातब्बर उमेदवारांकडून वेगवेगळ्या चाली खेळल्या जात आहेत. एखादा उमेदवार आपल्या प्रतिस्पर्ध्याची शे-पाचशे मते खात असेल तर त्याला आवश्यक ती ‘रसद’ काही उमेदवारांकडून पुरविली जातानाही दिसत आहे. अन्य उमेदवारांच्या विजयासाठी स्वत: ‘धारातीर्थी’ पडणार्‍या अशा अपक्ष उमेदवारांचीही काही प्रभागांमध्ये चलती असलेली दिसत आहे. काही उमेदवारांनी तर आपापल्या प्रभागातील काही बेभरवश्याची मते खाण्यासाठी म्हणून काही अपक्षांना बळेबळे मैदानात उतरविल्याचेही दिसत आहे.

निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अपक्षांपैकी काही उमेदवार तर असे आहेत की जे खरोखरच निवडणुकीत उभा राहिले तर एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी मते तरी त्यांना पडतील की नाही याची शंका आहे. मात्र असे उमेदवारसुध्दा अर्ज माघार घेण्यासाठी आणि इतरांना पाठिंबा देण्यासाठी लाखो रुपयांचा ‘हमीभाव’ मागत आहेत, त्यामुळे अनेक मातब्बर उमेदवार घायकुतीला आल्याचे दिसत आहेत.     

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जवळपास प्रत्येक मातब्बर उमेदवारांकडून अशा ‘खरेदी-विक्रीयोग्य’ उमेदवारांचा धांडोळा घेवून त्यांना आपलेसे करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासूनच या निवडणुकीतील संभाव्य अर्थकारणाची जाहीर चर्चा सुरू आहे, भेटवस्तू, पेटी, थैल्या, गाठोडी, झोळ्या अशा चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांकडे त्या त्या पक्षांकडून फार मोठे घबाड येणार असल्याचा अनेकांचा समज झालेला आहे. त्यामुळे या घबाडातील काही वाटा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हवश्या-गवश्या उमेदवारांनी माघार आणि पाठिंब्यासाठी आटापिटा चालविल्याचे दिसत आहे. काही अपक्ष उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये चांगलीच हवा तयार केल्याचे दिसत आहे. त्यामुळे असा अपक्ष उमेदवार यदाकदाचित विजयी झालाच तर त्याला आपल्या गोटात खेचण्यासाठी राजकीय नेत्यांनी आतापासूनच फिल्डींग लावल्याचे दिसत आहे. त्यासाठी अशा मातब्बर अपक्ष उमेदवारांना आतल्या अंगाने आवश्यक ती रसद पुरविण्याचे उद्योगही काही प्रभागांमध्ये जोमाने सुरू आहेत. एकूणच उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस जवळ येईल, तसा काही अपक्ष उमेदवारांचा घोडेबाजार तेजीत आल्याचे दिसत आहे.