Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Sangli › एक ऑगस्टला मतदान : आचारसंहिता लागू; 4 जुलैपासून अर्ज दाखल; 3 ऑगस्टला मतमोजणी

मनपा निवडणुकीचे बिगुल वाजले

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:07PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड  शहर महापालिका निवडणुकीचे सोमवारी (दि. 25) अखेर बिगुल वाजले. दि. 4 जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. दि. 1 ऑगस्टला मतदान आहे. दि. 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी आहे. निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने आज  सकाळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील व मनपा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर तत्काळ महापालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली. 

निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी पाटील आणि माझ्याबरोबर राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांंनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.  निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर तत्काळ आचारसंहिता लागू झाल्याचे जाहीर करत निवडणूक कायक्रम घोषित केला. 
प्रभाग 20, 78 नगरसेवक ते म्हणाले, तीनही शहरांसाठी 20 प्रभागांमध्ये ही निवडणूक होत आहे. यापैकी 18 प्रभाग हे चारसदस्यीय, तर दोन प्रभाग हे तीनसदस्यीय आहेत. यातून एकूण 78 नगरसेवक निवडून येणार आहेत. यामध्ये 39 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 11 (पैकी 6 महिला आरक्षित), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 21 (पैकी 11 महिला आरक्षित ) तर अनुसूचित जमाती (महिला)- 1 असे आरक्षण आहे. खुल्या प्रवर्गासाठी 45 ( पैकी महिला  आरक्षित 21) जागा आहेत. पालिकेसाठी 4 लाख 23 हजार 366 मतदार आहे. यात 2 लाख 15 हजार 89 पुरुष, 2 लाख 8 हजार 240 स्त्री व इतर 37  मतदारांचा समावेश आहे. 

पहिल्यांदाच सैनिकांचे मतदान

ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिका निवडणुकीत सैनिकांना मतदान करता येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविलेल्या यादीतून तीनही शहरात 142 सैनिकांची नोंद आहे. 

आदर्श मतदान केंद्राचे प्रयत्न

खेबुडकर म्हणाले, या निवडणुकीसाठी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. सुमारे 564 मतदान केंद्रे असून राखीव केंद्रांसह ही संख्या 600 वर जाणार  आहे. सर्व मतदान केंद्रात प्रशासनाच्यावतीने सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मतदान हे पवित्र काम काम आहे.  मतदार मतदान केंद्राकडे कसा आकृष्ट होईल याचा विचार करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रात शुध्द पाणी, शौचालये, दिवाबत्ती, महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र रांगा आदि सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. 
मतदारांना केंद्रात आल्यानंतर प्रसन्न वाटेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांचे शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंमार्फत ऑडीट होणार आहे. त्यातून आदर्श मतदान केंद्रे निवडण्यात येतील.

केबिन सील, वाहने जमा

निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच प्रशासनाने युद्धपातळीवर प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या पदाधिकार्‍यांची वाहने, मोबाईल व इतर सुविधा काढून घेण्याचे आदेश खेबूडकर यांनी दिले आहेत. महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकार्‍यांची केबीनही सील करण्यात आली. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणूक अधिसूचना दि.4 जुुलै रोजी प्रसिद्ध होणार
उमेदवारी अर्ज स्वीकारणे (अर्ज भरणे) : दि. 4 ते दि. 11 जुलै
उमेदवारी अर्जांची छाननी  : दि. 12 जुलै
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : दि. 17 जुलै
निवडणूक चिन्हांचे वाटप : दि. 18 जुलै
मतदान :  दि. 1 ऑगस्ट • मतमोजणी : दि. 3 ऑगस्ट
निकालाची राजपत्रात प्रसिद्धी : दि. 6 ऑगस्ट