Tue, Apr 23, 2019 09:45होमपेज › Sangli › आघाडीसाठी राष्ट्रवादीचा ३५ जागांचा प्रस्ताव

आघाडीसाठी राष्ट्रवादीचा ३५ जागांचा प्रस्ताव

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 10:50PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत आघाडीसंदर्भात राष्ट्रवादीने काँगेसकडे 78 पैकी 38 जागांच्या मागणीचा प्रस्ताव नुकताच सादर केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांची यासंदर्भात सांगलीवाडीत बैठक झाली. यामध्ये चर्चेत बराच खल झाला. यानंतर जयंत पाटील यांच्या सूचनेने श्री. बजाज यांनी शुक्रवारी जयश्री पाटील यांच्याकडे  प्रस्ताव सादर केला.    

महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली आहे. केंद्र, राज्यातील भाजपचे सत्तेचे बळ महापालिका निवडणुकीत मिळणार आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने केंद्र-राज्यासोबतच मनपा निवडणुकीतही आघाडी करावी, असा सूर पुढे आला आहे.

यासंदर्भात खुद्द जयंत पाटील यांनीच महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसला मोठा भाऊ म्हणत आघाडीसाठी साद घातली आहे. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर सोपविला. परंतु काँग्रेसमधून वेगवेगळी मते व्यक्‍त होत आहेत. 

गुरुवारी रात्री सांगलीवाडीत एका कार्यक्रमानंतर जयंत पाटील, जयश्री पाटील, विशाल पाटील आदींची बैठक झाली. या बैठकीतही जयंत पाटील यांनी जयश्री पाटील यांना आघाडीबाबत विचारणा केली. प्रचारात दोन्ही पक्षांकडून पुढे गेल्यानंतर आघाडीचा उशिरा निर्णय नको. यासाठी तत्काळ निर्णय द्यावा, अशी मागणी केली. श्री. बजाज हे यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव देतील, असे त्यांनी सूचित केले. त्यानुसार श्री. बजाज यांनी 35 जागा मागणीसह प्रभागनिहाय जागावाटपाचा प्रस्ताव जयश्री पाटील यांच्याकडे दिला. आता श्रीमती पाटील दोन-तीन दिवसांत याबाबत पक्षांतर्गत चर्चेनुसार निर्णय घेणार आहेत. 

तीनही शहरात प्रत्येक एक-दोन प्रभागात अडचण

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसंदर्भात दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद आहे. परंतु दोन्हीकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जागावाटपात जर इच्छुकांना संधी मिळाली नाही तर नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असाही सूर पुढे आला आहे. त्यामुळे आघाडीचा निर्णय लगेच करायचा की आचारसंहिता लागू होऊन अर्ज भरेपर्यंत लांबवायचा, अशी वेगवेगळी मते व्यक्‍त होत आहेत. दरम्यान, सांगलीवाडी (प्रभाग 14), कुपवाड (प्रभाग 1) व मिरजेत (प्रभाग 5-6) अशा ठिकाणी जागावाटपात  अडचण  आहे.