Tue, May 21, 2019 12:10होमपेज › Sangli › महापालिकेला जोखडातून मुक्‍त करा

महापालिकेला जोखडातून मुक्‍त करा

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:45PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

तिन्ही शहरांची मानसिकता नसताना जबरदस्तीने महापालिका लादण्यात आली. याचा फटका गेल्या 20 वर्षांत नागरिकांनी सोसला आहे. आता वाढत्या शहरीकरणाचे आव्हान महापालिकेच्या अपुर्‍या यंत्रणेला पेलणे अशक्य ठरले आहे. आता खुंटलेल्या विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सांगली, मिरज महापालिका विभाजन हाच पर्याय आहे. तांत्रिकदृष्ट्या हे शक्यही आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेऊन जोखडातून तिन्ही शहरांना मुक्‍त करावे, अशा भावना लोकप्रतिनिधी, नागरिकांनी व्यक्‍त केल्या. 

विभाजनाद्वारे चूक दुरुस्त करा : माजी आमदार संभाजी पवार

सन 1998 मध्ये वेगळी रचना असलेली सांगली, मिरज आणि कुपवाड शहरे एकत्र आणणे चुकीचे होते. याला मी, प्रा. शरद पाटील व कै. व्यंकाप्पा पत्की या तीनही आमदारांनी विरोध केला होता. तरीही जबरदस्तीने हा निर्णय लादला. ही सांगड कधीच जमली नाही. नगरपालिकांकडून मिळणार्‍या सुविधाही देता आल्या नाहीत. आता विभाजन करून चूक सुधारावी. सांगली, कुपवाडची एक व मिरजेची महापालिका करावी. 

तत्काळ सर्व्हेद्वारे निर्णय घ्यावा : मनोहर सारडा

देशात तीन शहरांची महापालिका एकमेव सांगलीच आहे. असुविधांत देशात आपल्या महापालिकेचा पहिला क्रमांक लागेल. विस्ताराने मोठी असलेल्या तीन शहरांना एक महापालिका न्याय देऊच शकत नाही. त्यासाठी तत्काळ शासनाने सर्व्हे करून विभाजनाचा निर्णय घ्यावा. दोन महापालिकांद्वारे कारभार व कारभार्‍यांवरही नियंत्रण राहील. जनतेलाही सुविधा मिळतील.

निधी पळवापळवी थांबेल : माजी महापौर सौ. कांचन कांबळे

उत्पन्नात सांगली आघाडीवर तर निधी पळवापळवीत मिरज आघाडीवर असते. एवढे करूनही तीनही शहरांच्यादृष्टीने विकासाच्याद‍ृष्टीने मागासलेली आहेत. राजकीय सत्तासंघर्षही यात अडथळा आहे. त्यामुळे सांगली, मिरज दोन महापालिका करून याला पूर्णविराम देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्वपातळीवर उठाव व्हायला हवा.

विभाजन करा, कुपवाड सांगलीतच : माजी उपमहापौर प्रशांत पाटील

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांचा 18 वर्षांत विकासासाठी संघर्ष सुरूच आहे. नागरी सुविधांमध्ये सांगली, मिरजेच्या साठमारीत कुपवाडची घुसमट होत आहे. पाणी पुरवठा, स्वच्छता या मूलभूत सुविधा सांगलीतूनच मिळत आहेत. सांगली, मिरजेत कामे झाल्यानंतर कुपवाडकडे लक्ष दिले जाईल. अपुर्‍या यंत्रणेतून कोणतीही सत्ता असो, विकास अशक्यप्राय आहे. त्यामुळे सांगली, मिरज महापालिका विभाजन हाच पर्याय आहे. दोन महापालिकांना स्वतंत्र यंत्रणा आणि निधी मिळेल. विकासाची कवाडे खुली होतील. पण हे करताना कुपवाडला भौगोलिकदृष्ट्या सांगलीतच घ्यायला हवे.

सत्तासंघर्ष संपून विकास होईल : नगरसेवक विष्णु माने

तीन शहरांची रचना, सुविधा आणि योजनांसाठी लागणारा निधी यात तफावत आहे. त्यामुळे विकासाच्यादृष्टीने तीनही शहरातील नगरसेवक, कारभार्‍यांत वाद हा ठरलेलाच. यातून तीनही शहरांचा विकास होऊ शकला नाही. यामुळे आता सांगली, मिरज दोन महापालिका करणे गरजेचे आहे. दोन महापालिका झाल्यास सांगली, कुपवाड एकत्रित महापालिकेद्वारे उत्पन्न आणि विकासालाही गती मिळू शकेल.

मिरज पॅटर्नचे भूत दूर होईल : वि. द. बर्वे

तत्कालीन मंत्री अण्णा डांगे यांनी आपल्या अट्टाहासापायी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका लादली. या शहरांची गरज, वातावरण वेगळे असताना हा कारभार चुकीचा होता. त्यातून विकासाऐवजी शहर भकास झाले. यामध्ये मिरज पॅटर्न हा तर कळीचा मुद्दा आहे. या विकासाला लागलेला अडथळा दूर करण्यासाठी विभाजन करून सांगली, मिरज महापालिका वेगळ्या कराव्यात. याद्वारे सांगलीकरांच्या मानगुटीवरील ‘मिरज पॅटर्न’चे भूत हटेल. सांगली, कुपवाडचा विकास होईल.

विकासातील अडथळे दूर होतील : अ‍ॅड. सुनील नाईक, माजी उपायुक्‍त

तीन शहरांची महापालिका झाल्याने 118 चौरस किलोमीटरचा विस्तार पाहता विकासाचे मोठे आव्हान होते. त्यादृष्टीने कोणतीही टर्म आणि सत्ता आली तरी त्यांनी पहिल्या वर्षीच पाच वर्षांचा विकास आराखडा करून अंमलबजावणी करणे गरजेचे होते. शिवाय अंदाजपत्रकही जनताभिमुख असायला हवे होते. नागरिकांना विचारूनच सुविधा ठरवायला हव्या होत्या. ते काही झाले नाही. उलट सत्तासंघर्ष आणि मतांच्या राजकारणानुसारच विकासकामे होत राहिली. त्यामुळे काही भागांवर अन्याय झाला. किमान यातून सत्तासंघर्ष आणि विकासकामात अडवणुकीच्या खेळी महापालिका विभाजनाद्वारेच थांबतील. त्यासाठी दोन स्वतंत्र महापालिका हाच पर्याय आहे. तांत्रिकदृष्ट्या लोकसंख्येची अडचण आली तरी आसपासच्या गावांचा समावेश आता समान करप्रणालीमुळे होईल. 

विभाजनाशिवाय पर्यायच नाही : रमेश वाघमारे - (माजी अधिकारी)

सांगली, मिरज आणि कुपवाड ही ‘ड’ वर्गातील सर्वात मोठी महापालिका आहे. तब्बल 118 चौरस किलोमीटर सुविधा एका यंत्रणेकडून देणे कोणालाही शक्य नाही. अपुरे अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा हा तर मोठा प्रश्‍न आहे. सांगली, मिरज आणि कुपवाडच्या संस्कृती वेगळ्या आहेत. गरजा वेगळ्या आहेत. यासाठी सांगली, मिरज दोन स्वतंत्र महापालिका केल्याशिवाय समतोल विकास शक्य नाही. तांत्रिकदृष्ट्या यात कोणतीच अडचण नाही.

समतोल विकासाचा हाच मार्ग : उद्योजक प्रदीप दडगे

सांगली, मिरज या शहरांच्या उद्योग, व्यापारासह सर्व गरजा वेगळ्या आहेत. सांगलीची सर्वाधिक मोठी व्यापार पेठ आहे. परंतु त्या तुलनेत सुविधा मिळत नहीत. तीन शहरांच्या तुलनेत दहा टक्केही महापालिकेची यंत्रणा नाही. त्यामुळे विकासाच्या, नागरिकांच्या अपेक्षा कशा पूर्ण होणार? त्यासाठी सांगली, मिरज महापालिकांचे विभाजन करावे. हा तीनही शहरांच्या विकासाचा मार्ग ठरेल.

अडथळे दूर होतील :सतीश साखळकर

गेल्या 18 वर्षांत विकासकामांच्या आडून प्रशासन, कारभार्‍यांनी सत्तेचा बाजारच केला. त्यातून तीनही शहरांना काय सुविधा मिळाल्या हे जनतेसमोर आहे. दोन्ही शहरांचे नागरिक एकमेकांच्या सांगली, मिरजेला निधी पिळविला म्हणून ओरडतात. शिवाय दोन्ही कारभारीही सांगली, मिरजेच्या परस्पर नावाने निधी, पदे पळवापळवीचा आरोप करीत नेहमी लपत आले आहेत. त्यामुळे आता विकासाला लागलेला गुणा थांबविण्यासाठी महापालिका विभक्‍त करणे हाच पर्याय आहे. याद्वारे दोन्ही महापालिकांना स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ, योजना मिळतील.  यातून निधीची पळवापळवी आणि खेळखंडोबा थांबेल. शिवाय कोणत्या शहरातून किती कर मिळतो आणि विकासाचा कोण खेळ मांडतो हे स्पष्ट होईल. त्यादृष्टीने नागरिकांतून सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून चर्चा करून योग्य तो लढा 
उभारू. 

कारभार अन् विकासही आवाक्यात : कय्यूम पटवेगार

तीन विभिन्न गरजा असणार्‍या शहरांची महापालिका करणे चुकीचेच होते. तरीही महापालिकेच्या कारभारावर काँग्रेसनेते स्व. मदन पाटील यांचे नियंत्रण होते. आता दुर्दैवाने कारभारी त्यांच्या पश्चात सैरभैर झाले आहेत. मनमानी कारभार सुरू आहे. शिवाय गटबाजीमुळे एकहाती सत्ता असूनही विकासाचा खेळखंडोबा झाला. यामुळे आता स्वतंत्र महापालिका करूनच विकास आणि कारभार आवाक्यात येईल. त्याशिवाय पर्याय नाही.