Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Sangli › कुपवाडचा वनवास आतातरी संपवा

कुपवाडचा वनवास आतातरी संपवा

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 8:21PM

बुकमार्क करा
कुपवाडची स्वतंत्र नगरपालिकाच करा : शशिकांत गायकवाड

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका तीनही शहरांचा विकास करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे सांगली व मिरज या दोन स्वतंत्र महापालिका आणि कुपवाडमध्ये पूर्ववत नगरपालिका करणे गरजेचे आहे. मुळात तीनही शहरांची महापालिका हा अन्याय्य आणि लादलेला निर्णय होता. तीनही शहरातील नागरिकांची तशी मानसिकता नव्हती. त्यानंतर भ्रष्ट आणि निष्क्रिय अधिकारी, कारभारी यांनी तीनही शहरांचा विकास केला नाही. स्वतःचाच जेवढा करता येईल तेवढा विकास केला.त्यामुळे तीनही शहरे भकास झाली आहेत. कुपवाडवर तर गेली वीस वर्षे  अन्यायच केला आहे. कुपवाडमधून प्रचंड कर महापालिका गोळा करते मात्र कोणत्याही सुविधा देत नाही. त्यामुळे आता तातडीने विभाजन करून कुपवाडसाठी नगरपालिका करावी. नंतरच निवडणूक घ्यावी. विभाजनासाठी आता तीनही शहरांतील नागरिकांनीच आवाज उठवणे आवश्यक आहे.

कुपवाडला नगरपालिका करण्याची गरज : गजानन मगदूम, नगरसेवक 

कुपवाड शहराचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर शहराचा विकास होईल. नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची होती. परंतु प्रशासनाने नागरिकांवर कराचा भला मोठा बोजा वाढविला. त्यातून कर संकलन झाले. जेवढा कर प्रशासनाने नागरिकाकडून वसूल केला. त्यातील निम्मा करही प्रशासनाने विकास कामांवर खर्च केला नाही. त्यामुळे शहराची आजही अवस्था केविलवाणी आहे. कुपवाडला स्वतंत्र नगरपालिका होणे गरजेचे आहे.  

पालिका प्रशासनाकडून कुपवाडवर अन्यायच : प्रकाश ढंग (भाजप जिल्हा सरचिटणीस) 

कुपवाडचा महापालिकेत समावेश झाल्यापासून आत्तापर्यंत कोणत्याही सुविधा शहराला मिळालेल्या नाहीत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून  वीस वर्षात नागरिकांना फक्त आश्वासनाचे गाजरच मिळाले आहे. कुपवाडला प्रशासनाची भली मोठी इमारत आहे. तरीदेखील अधिकारी कुपवाडमध्ये येत नाहीत तर सांगली मिरजेतच ठिय्या मारतात. त्यामुळे नागरिकांना विविध कामासाठी मुख्य अधिकार्‍यांना भेटण्यासाठी सांगली, मिरजेला हेलपाटे मारावे लागतात. एवढे करूनही अधिकारी भेटतील यांची खात्री नाही. नागरिक गेल्या वीस वर्षापासून तोंड बांधून बुक्कयांचा  मार सहन करीत आहेत. शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर कुपवाडसाठी स्वतंत्र नगरपालिका होणे गरजेचे आहे. 

विस्तारीत भागावर सातत्याने अन्याय : अरूण जगताप, (सामाजिक कार्यकर्ते) 

महापालिका प्रशासन व बहुसंख्य नगरसेवकांकडून अठरा ते एकोणीस वर्षांत कुपवाड शहरासह विस्तारीत परिसरातील नागरिकांना कोणत्याही मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. लोकप्रतिनिधी आपल्या भागात फिरत नाहीत. 

त्यामुळे नगरसेवक दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना नागरिकांना जाहीर करावी लागत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. हा अन्याय सहन करण्यापेक्षा कुपवाड शहराला महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका होणे गरजेचे आहे.

महापालिकेमुळे भ्रमनिरास  : अख्तरहुसेन मुजावर (माजी दर्गा सरपंच) 

कुपवाड ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा आहे. या कारणाने विस्तारित भागात सामान्य नागरिकांना प्राथमिक सुविधापासून वंचित रहावे लागत होते. यासाठी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी कुपवाड ग्रामपंचायतीची नगरपालिका करून सामान्य नागरिकांच्या आशा उंचावल्या. अशातच राजकीय वर्चस्वातून तत्कालीन मंत्र्यांनी नगरपालिका बरखास्त करून केवळ शहराचा महापालिकेत समावेश करून जनतेचा भ्रमनिरास केला. महापालिका स्थापना होवून एकोणीस वर्षात केवळ कर आकारणीपुरतीच महापालिका राहिली आहे असे वाटते. पण विकासाबाबतीत आजही कुपवाड शहर ग्रामपंचायतीमध्येच आहे. त्यामुळे  महापालिका म्हणजे सांगा मी कुणाची, अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. याचा विचार करुन कुपवाड स्वतंत्र नगरपालिका होणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायतीचा कारभार बरा होता : दिनकर लोकरे (सामाजिक कार्यकर्ते)

कुपवाड नगरपालिका असताना सफाई, पाण्यासह सर्व सुविधा चांगल्या मिळत होत्या. पण  नाहक महापालिकेत ओढून अन्याय करण्यात आला. मनपाचे कराचे बोजे एमआयडीसीचे वाटोळेच करणारे ठरले. सांगली, मिरजेच्या दादागिरीत गेल्या 20 वर्षांत कुपवाडला बकाल करण्याचा उद्योग झाला. कुपवाडचा मागासलेपणा आणि सांगली, मिरजेच्या तुलनेत अधिक गरजा लक्षात घेऊन महापालिका, शासनाने अधिक तरतूद करायला हवी होती. आता तीन शहरांचा विकास करायला महापालिका अपुरी पडत आहे. त्यामुळे मिरज स्वतंत्र महापालिका करून सांगली, कुपवाडला एकत्र करावे. विकासाचा मार्ग खुला होईल. 

मिरज पॅटर्नचा विळखा सोडवा :   दिलीप पाटील

सांगलीतून सर्वाधिक कर गोळा होतो. त्या तुलनेत मिरजेकडून कर किती गोळा  होतो? निधी मात्र दुप्पट खर्च केला जातो. त्यामुळे समतोल विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे आता या मिरज पॅटर्नमधून सांगली आणि कुपवाडला मुक्‍त करावे, स्वतंत्र महापालिका करणे हा समतोल विकासाचा मार्ग ठरेल.