होमपेज › Sangli › भोजनावळी बरोबर आता भेटवस्तूंचा डबल बार 

भोजनावळी बरोबर आता भेटवस्तूंचा डबल बार 

Published On: Feb 12 2018 2:05AM | Last Updated: Feb 11 2018 8:08PMसांगलीः शशिकांत शिंदे 

बहुतेक निवडणुकात चोरी - छुपे चालणार्‍या गोष्टी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जाहीर वक्तव्यामुळे  आता चव्हाट्यावर आल्या आहेत.  ‘मतदारांच्या घरी जाताना भेट वस्तू घेऊन जा’, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे मतदारांच्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. खाणे- पिणे आणि भोजनावळी बरोबर भेट वस्तू मिळणार, या कल्पनेने काहींच्यात उत्साहाचे वातावरण आहे. येत्या महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी यापेक्षा आणखी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातील,  आमिषे दाखविली  जातील.  त्याला सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील मतदार भूलणार का? आणि विकासाच्या मुद्द्यांचे काय होणार? याचीही चर्चा सुरू झाली आहे. 

साम, दाम, दंड आणि भेद आदी सर्व मार्गाचा वापर निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी होतो. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्याला काही अपवाद असतीलही. गेल्या काही वर्षात याचे प्रमाण वाढत आहे.  मात्र याचा प्रत्येक वेळी अनुकूल फायदा होतोच, असे नाही. तरी सुद्धा असे विधान भारतीय जनता पक्षाच्या आतल्या गोटातील मानले जात असलेल्या चंद्रकांतदादांनी केले आहे. सध्या केंद्रात, राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अनेक नगरपालिकावर त्यांचा झेंडा फडकला आहे. आता शिल्लक राहिलेल्या महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.  महापालिका क्षेत्रातील त्यांच्या भेटी वाढू लागल्या आहेत. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणे यात काहीच गैर नाही. मात्र त्यांच्या वस्तू वाटपाच्या विधानामुळे चर्चा  सुरू झाली आहे. त्यावर विरोधकांनी टिका केली आहे तर काहीजण बुचकळ्यात पडले आहेत. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढत आहेत. 

तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सांगली, मिरज या दोन नगरपालिका आणि कुपवाड ग्रामपंचायत एकत्र करून  महापालिका केली. या घटनेला वीस वर्षे झाली तरी तिन्ही शहराच्या तीन तर्‍हा आहेत. महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण  विकास झालाच नाही. पहिल्या  दहा वर्षात माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाला सत्ता मिळाली. त्यानंतर  माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मोनोरेल पासून विमानतळापर्यंत वेगवेगळी स्वप्ने आणि आमिषे  दाखवली. त्यामुळे त्यांना सत्ता मिळाली. मात्र आघाडीचे बारा वाजले आणि लोकांचा अपेक्षाभंग झाला. अनेकांनी लाखो रुपये खर्च करून ही त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करीत जनतेने पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात सत्ता दिली. 

महापालिकेत पक्ष बदलला, नेते बदलले मात्र बहुतेक कारभारी मात्र तेच आहेत. कोणत्यावेळी एकत्र यायचे आणि कोणत्यावेळी विरोधाचे नाटक करायचे, याचे इंगित  त्यांना सापडल्याचे दिसत आहे. या प्रस्थापित  सोनेरी टोळीचा आणि कारभार्‍यांचा विकास कित्येक पट्टीने झाला आहे. मात्र महापालिका क्षेत्राचा विकास काही  झालेला नाही. तुलनेत पुणे, सातारा, कोल्हापूर शहराची प्रगती झपाट्याने होत आहे.  

महापालिकेत आता जरी काँग्रेसची सत्ता असली तरी राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. सांगली आणि मिरजेचे   आमदार भाजपचे आहेत. या दोन्ही आमदारांना प्रशासनावर दबाव आणून विकास कामाला चालना देता आली असती. नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंडे सारखे अधिकारी आपल्याकडे आणले आले असते तर अनेक प्रश्‍न मार्गी लागले असते. महापालिकेतील सध्याच्या मनमानी कारभाराला चाप बसला असता.  त्याशिवाय चंद्रकांतदादांना आठवड्याला सांगलीला येण्याची आणि वस्तू वाटपाचे विधान करण्याची वेळ आली नसती. 

निवडणुकीत जिंकून येण्याचे तंत्र अनेकांनी चांगलेच अवगत केले आहे. भागातील मंडळांना सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी देणग्या देणे,  विविध  स्पर्धांचे आयोजन करीत भेट वस्तू, बक्षीस वाटप करणे, निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची आणि भोजनावळीची व्यवस्था करणे आदी गुप्तपणे चालणारे हे प्रकार सर्वांना माहित   आहेत. मात्र आता चंद्रकांतदादांच्या भेटवस्तूच्या फंड्यामुळे  आताच चर्चा रंगू लागली आहे.  

महापालिका क्षेत्रातील जनता सूज्ञ आहे. कोणाचा कोणत्या वेळी ‘करेक्ट’ कार्यक्रम करायचा हे तिला चांगले समजते.  किमान गेल्या वीस वर्षाच्या अनुभवातून त्यांना प्रचिती आली असावी.  अन्यथा पुढील निवडणुकीत ‘भेटवस्तू’पेक्षा वेगळा काही फंडा आला तर नवल असणार नाही. विकासकामाच्या मुद्दयाचे मात्र चांगभलेच होणार आहे. 

भल्याभल्या उमेदवारांना दणका

आतापर्यंतच्या निवडणुकीत भल्या -भल्या उमेदवारांना दणका बसला आहे. काही वार्डात एका मताचा दर तीन हजार रुपयापर्यंत गेला होता.  या काही दिग्गजांना मतदारांनी धडा शिकवला.  असे उमेदवार या निवडणुकीतही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यांच्या आमिषाला जनता भूलणार की त्यांना धडा शिकवणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.