Mon, Jun 17, 2019 14:38होमपेज › Sangli › मिरजेचा खुंटलेला विकास तरी होईल

मिरजेचा खुंटलेला विकास तरी होईल

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 8:51PM

बुकमार्क करा

मिरज : जालिंदर हुलवान                       

सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका झाल्यापासून शहरात पदांचा विकास झाला; पण शहराचा विकास खुंटला आहे. खुंटलेला विकास पुन्हा करायचा असेल तर या दोन्ही शहरांचे विभाजन होणे गरजेचे आहे. शासनाने आता तसा निर्णय घ्यावाच.  त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

मिरजेचा विकास शंभर टक्के होईल : नितीन वायचळ (विकास मंच, मिरज)

मिरजेमध्ये अनेक प्रश्न आजही कायम आहेत. ते सुटले पाहिजेत. नागरिकांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या नसतात. पण ज्या माफक मागण्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत. 1998 मध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड मिळून महापालिका झाली. त्यावेळी माजी आमदार हाफीज धत्तुरे यांनी विभाजनाची मागणी केली होती. त्याचवेळी विभाजनाचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण तरीही आता वेळ गेलेली नाही. आता विभाजन करणे गरजेचे आहे.

मिरजेसाठी स्वतंत्र निधी मिळेल : सूर्यकांत धोंगडे (नारळ विक्रेता) मिरज स्वतंत्र महापालिका झाल्यास मिरजेसाठी स्वतंत्र निधी मिळेल. रस्त्याची सुधारणा, भाजीमंडईचा विषय, मिरजेतील कचर्‍याच्या समस्या, रस्त्यातील खड्डे, बालगंधर्व नाट्यगृहाकडे दुर्लक्ष, मिरज लक्ष्मी मार्केट इमारतीकडे दुर्लक्ष असे अनेक प्रश्न तरी सुटतील.

विभाजनासाठी उठाव करू : पृथ्वीराज पाटील (काँग्रेस नेते)

सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या महापालिकेला पुरेसा निधी मिळत नाही. तीन शहरांसाठी यंत्रणाही अपुरी असल्याने कोणत्याही शहराच्या विकासाला न्याय मिळत नाही, हे आता 20 वषार्र्ंत उघड झाले आहे. त्यामुळे सांगली, मिरज अशा दोन महापालिका करणे हाच यावर पर्याय आहे. समतोल विकासासाठी राज्याचे विभाजन होते, तर महापालिकांचे विभाजन होण्यात अडचण काय? दोन्ही महापालिकांसाठी आसपासच्या गावांशी चर्चेने तसे ठराव करणे गरजेचे आहे. त्यांना आता शहरीकरणाचे लाभ मिळू शकतील. त्यासाठी लोकप्रतिनिधींतून उठाव होणे गरजेचे आहे. यामध्ये आम्ही पुढाकार घेऊ.

विकासाची कवाडे खुली होतील : चिंटू पवार

लादलेल्या महापालिकांतून विकासाचा खेळखंडोबाच सुरू आहे. मिरजेत वारंवार निवडून येणारे मातब्बर नगरसेवक निधी पळवितात. सांगलीकर वारंवार नगरसेवकांना संधी देत नसल्याने या मातब्बरांसमोर फिके पडतात. वास्तविक करवसुली सांगलीची, मात्र अधिक निधी मिरजेला हे सुरूच आहे. त्यासाठीच नियोजनबध्द विकास होऊ शकला नाही. महापालिकेची असणारी यंत्रणाही तीन शहरांसाठी अपुरी आहे. त्यामुळे आता सांगली, मिरज स्वतंत्र महापालिका ही काळाची गरज बनली आहे.तसे झाल्यास विकासाची कवाडेच खुली होतील.

स्वतंत्र प्रशासन व निधी मिळेल : अ‍ॅलबर्ट खानविलकर (राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू)

मिरज हे ऐतिहासिक शहर आहे. संगीतनगरी, वैद्यकीय पंढरी जशी आहे, तशीच ती फुटबॉल नगरीही आहे. फुटबॉल या खेळाकडे महापालिकेने कधी लक्ष दिलेच नाही. जर मिरजेला स्वतंत्र महापालिका झाली तर खेळाकडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न होतील. आयुक्त, उपायुक्त व अन्य अधिकारी हे मिरजेत पूर्णवेळ असतील. त्यामुळे खेळाडूही त्या प्रशासनाकडे त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करू शकतील. त्या अधिकार्‍यांनाही मिरजेच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल.

तरुणांसोबत लढा उभारू : तानाजी रुईकर (जिल्हा सुधार समिती)

महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे आहे. पण विभाजन झाले तर विकासाला नवीन व कार्यक्षम चेहरे हवेत. नवीन कुरणात जुने प्राणी सोडले की ते चौफेर उधळून कुरणाची वाट लावतात; त्याप्रमाणे शहराच्या अधोगतीची पुनरावृत्ती नकोय. 

आजवर मिरजेच्या अस्मितेचा गैरफायदा घेणारे मिरज पॅटर्न व ठराविक घराणी आता बाजूला ठेवली पाहिजेत. नव्या व कार्यक्षम तरुणांनी मिरज शहराला स्वच्छ सुंदर व निरोगी बनवण्यासाठी पुढे आले पाहिजे तरच हे विभाजन सर्वार्थाने सार्थ ठरेल. 

शहराला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी सुधार समितीच्या माध्यमातून तरुणांसोबत लढा उभारू व विभाजनाबरोबरच नवे राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

शहरासह ग्रामीण भागाचाही विकास होईल : ओंकार शुक्‍ल (भाजप नेते) 

मिरज ही पूर्वी नगरपालिका होती. त्या नगरपालिकेची महापालिका झाली. पण सांगली शहर त्यामध्ये असल्याने मिरजेकडे दुर्लक्ष झाले. ज्या उद्देशाने महापालिका स्थापन झाली होती. तो उद्देश संपूर्ण सफल झाला नाही. मिरजेतील प्रश्‍न जसेच्या तसे राहिले. पूर्वी पालिकेवर काही ठराविक लोकांची मक्तेदारी होती. त्यामध्ये सांगलीच्या काही लोकांची भर पडली. मिरजेचा विकास करण्यासाठी पुन्हा शहरासह काही ग्रामीण भागाचा समावेश करून मिरजेची महापालिका व्हायला पाहिजे. त्यामुळे त्या ग्रामीण भागाचाही विकास होईल.   

आम्हीही पाठपुरावा करू : मुस्तफा बुजरूक (मिरज शहर सुधार समिती)

मिरजेच्या विकासासाठी स्वंतत्र पालिका हाच शेवटचा पर्याय आहे. सांगली, मिरज, कुपवाड ह्या तिन्ही शहरांची ऐतिहासिक, भौगोलिक आणि सामाजिक पार्श्वभूमी भिन्न आहे. सांगली-मिरजेच्या श्रेयवादात मिरजेला कमी लेखण्याचा प्रयत्न नेहमीच झालेला आहे. महापालिका स्थापनेपासून मिरजेच्या विकासाच्या दृष्टीने कोणताच निर्णय झालेला नाही. उलट मिरजेचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वतंत्र पालिकेमुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होऊन शहराच्या विकासाचे धोरण प्रभावीपणे राबविता येईल. स्वतंत्र पालिका अस्तित्वात आल्यास तिन्ही शहरांचा योग्य विकास होईल.

झपाट्याने विकास होईल : विलास देसाई (मराठा सेवा संघ)

सांगली आणि मिरज या दोन वेगवगेळ्या  महापालिका होणे गरजेचे आहे. महापालिका झाल्यापासून फक्त सांगलीचाच विकास झाला. यामध्ये मिरज आणि कुपवाड खूप मागे राहिले. मिरजेच्या आजूबाजूची गावे समाविष्ट करून मिरज महापालिका झाल्यास मिरजेला खूप पायाभूत सोयी व सुविधा उपलब्ध करून देता येतील. खरंतर नगरपालिकेची, महापालिका केली त्याच वेळेला दोन स्वतंत्र महापालिका व्हायला हव्या होत्या. स्वतंत्र महापालिकेमुळे स्वतंत्र निधी, स्वतंत्र यंत्रणा, स्वतंत्र प्रशासन यामुळे मिरजेचा विकास वेगाने होईल, यात शंकाच नाही.

प्रलंबित प्रश्न तरी सुटतील : अमजद जमादार (सामाजिक कार्यकर्ते)

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका होऊन देखील भाजी बाजार, चांगले रस्ते, नगरविकास, कचरा उठाव, मिरज मार्केटचे नूतनीकरण तसेच प्राथमिक स्वरूपाच्या सर्व सोयी व सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी असे अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले. मग मनपाचा उपयोग तरी काय? निव्वळ जनतेकडून विनाकरण जाचक कर वसुली नाही काय? त्यापेक्षा मिरज महापालिका झालेली बरी आणि ती लोकहिताची ठरेल.

विभाजनाचा पर्याय चांगला : धनंजय गडदावर (व्यावसाईक) 

मिरजेची स्वतंत्र महापालिका झाल्यास मिरजेला फायदाच होईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एक तर स्वतंत्र निधी मिळेल आणि प्रशासनही पूर्णवेळ मिरजेत काम करेल. मिरजेतील शासकीय दूध योजना, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य असे प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. पालिका विभाजन झाल्यास शासनाकडून येणार्‍या निधीची पळवापळवी बंद होऊन स्वतंत्र निधी मिळेल. त्यामुळे शहराच्या विकासात भर पडेल. मागील 19 वर्षात मिरजेला आलेले बकालपण दूर होईल. रस्ते, पाणी, ड्रेनेज यासारखे मूलभूत प्रश्न लवकर मार्गी लागतील. 

सांगली व मिरजेचा विकास होईल : तानाजी सातपुते (शिवसेना नेते) 

मिरज आणि सांगली या दोन्ही शहरांचे विभाजन होऊन दोन महापालिका झाल्यास दोन्ही शहरांचा विकास होईल. उद्योगधंदे, व्यापार सुधारेल. भाजी मार्केट होईल. फळ मार्केट होईल. सांगलीकर म्हणतात मिरजेला निधी गेला आणि मिरजेत तर काही काम दिसत नाही. त्यामुळे नेमका निधी जातो कुठे? हे समजत नाही. स्वतंत्र महापालिका झाल्यास निधी जातो कुठे ते कळेल. कसेही करून मिरजेचा विकास करण्याची गरज आहे. 

सांगलीच्या विकासाचा मार्ग खुलेल :  नंदकुमार साळुंखे (नागरिक)

महापालिका स्थापनेपासून तीनही शहरांच्या विकासाचा खेळखंडोबा सुरू आहे. नागरी सुविधा मिळत नाहीत. रस्त्यांच्या दुरवस्थेने विकास खुंटला आहे. सांगली, कुपवाडच्या करावर मिरजेला विकासाच्या नावे निधी पळविला जातो. त्यामुळे दोन्ही शहरांचा विकास खुंटला आहे. मिरजेची स्वतंत्र महापालिका झाली तर विकासाला येथील निधी येथेच खर्च होऊ 
शकेल. 
 

विभाजनाशिवाय विकास नाही : फकिरा कागले (नागरिक)

माजी मंत्री अण्णा डांगे यांनी लादलेल्या तीन शहरांच्या महापालिकेचा शहराच्या विकासाला फटका बसला आहे. 

तीन शहरांच्या तीन तर्‍हा आणि त्यातून सत्तासंघर्ष हा पायात पाय घालणारा ठरला आहे. उपनगरे दलदलीत, मुख्य रस्त्यांचे अतिक्रमण अशा अनेक समस्या कायम आहेत. यामुळे स्वतंत्र महापालिका करणे हाच विकासाला पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांना किमान मूलभूत सोयीसुविधा मिळू शकतील.