Sat, Apr 20, 2019 10:04होमपेज › Sangli › आयाराम-गयाराम यांची हवा गरम

आयाराम-गयाराम यांची हवा गरम

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 12:00AMसांगली : चिंतामणी सहस्रबुद्धे

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण  आता क्रमाक्रमाने तापत चालले आहे. या निवडणुकीत महापालिकेतील सत्तारुढ काँग्रेस पक्ष एकटा लढणार, की त्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होणार, याची चर्चा एकीकडे सुरू आहे. त्याचवेळी भाजप आणि शिवसेनेची युती होणार का, असाही प्रश्न विचारला जातो आहे. मात्र सगळ्यात अधिक चर्चा आहे, ती आयाराम-गयारामांची. 

प्रत्येक प्रभागाची रचना अशी आहे, की तिथे प्रस्थापित राजकीय पक्षांतील अनेक जण इच्छुक आहेत. त्या सगळ्यांचे समाधान करणे नेत्यांना अवघड आहे. कुणाला थांबवायचे आणि कुणाची समजूत घालायची, असा प्रश्न नेत्यांसमोर उभा राहणार आहे. त्यामुळे या परिस्थितीवर लक्ष ठेवून अन्य पक्षाचे नेते आहेत. त्यांना आयते उमेदवार अनेक ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी आयाराम-गयारामांची हवा सध्या गरम  आहे.  

सांगली जिल्हापरिषद आणि जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांची निवडणूक अशा आयाराम-गयारामांमुळेच गाजली होती. त्याआधी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही पक्षांतरच गाजले होते. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे निवडून आलेले खासदार संजय पाटील हे आधी  काँग्रेस, नंतर अपक्ष आणि नंतर राष्ट्रवादी असा प्रवास करूनच आले होते. विधानसभा निवडणुकीत शिराळा, जत येथेही पक्षांतर करून आलेले शिवाजीराव नाईक आणि विलासराव जगताप भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. 

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे  आमदार अनिलराव बाबर हेही राष्ट्रवादीतूनच आले होते. भाजपतर्फे पलूस-कडेगाव मतदारसंघात निवडणूक लढवलेले पृथ्वीराज देशमुख हेसुद्धा राष्ट्रवादीतूनच पक्षांतर करून आले होते. नंतर तर त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपदही बहाल करण्यात आले. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवलेले अजितराव घोरपडे हेसुद्धा मूळचे त्या पक्षाचे नव्हेत. 

त्यामुळे पक्षांतराचा फॉर्म्युला यशस्वी होतो आहे, हे लक्षात आल्यानंतर तोच जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही वापरण्यात आला. जिल्हापरिषद, तसेच जत, पलूस, कडेगाव, आटपाडी, मिरज, खानापूर अशा पाच पंचायत समित्यांमध्येही भाजप आणि शिवसेनेची सत्ता या पक्षांतरामुळेच आली. 

विशेष म्हणजे पलूस आणि कडेगाव या दोन पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली होती. एका अर्थाने ती राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले देशमुख आणि राष्ट्रवादीत असलेले अरुणअण्णा लाड यांचीच युती होती. जिल्हापरिषदेतील सत्तारुढ आघाडीत  भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनाही सहभागी आहे. त्याचवेळी हे तीनही पक्ष स्थानिक राजकारणात परस्परांच्या विरोधातही आहेत. पलूस-कडेगाव पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी भाजपबरोबर आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या हल्लाबोल यात्रेतही राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर होते आणि  भाजपच्या सरकारवर टीका करीत होते. 

त्यामुळे एकंदर स्थिती पाहिली, तर पक्षीय तत्वज्ञानापेक्षाही स्थानिक हितसबंध आणि सत्ता हे कळीचे मुद्दे आहेत. त्यातून सोयीस्कर युती किंवा आघाडी होताना दिसते आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात खासदार पाटील यांचा राष्ट्रवादीशी संघर्ष सुरू आहे. त्याचवेळी पक्षाचे नेते अजितराव घोरपडे यांच्याशीही त्यांचे फारसे जमत नाही. खानापूर-आटपाडीत भाजपचे गोपीचंद पडळकर, राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख, काँग्रेस नेते सदाशिवराव पाटील यांचे मनोमीलन आहे.या आघाडीशी खासदार पाटील यांचे सख्य आहे. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार बाबर हे भाजपच्या राज्यपातळीवरील नेत्यांच्या सतत संपर्कात असतात. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याशीही त्यांचा ऋणानुबंध आहे.

पलूस-कडेगाव मतदारसंघात भाजपचे खासदार पाटील आणि त्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे सख्य जगजाहीर आहे. मात्र त्या मतदारसंघात खासदारांचे काँगेसच्या कदम गटाशी चांगले सबंध आहेत. मिरजेत खासदारांचे काँग्रेसच्या स्थानिक नेतेमंडळीशी सलोख्याचे सबंध आहेत. सांगलीतही त्यांचे दिवंगत काँग्रेस नेते मदनभाऊ पाटील यांच्या गटाबरोबर चांगले जमते. तेवढे सख्य भाजपचे आमदार आणि शहर जिल्हाध्यक्ष सुधीर गाडगीळ आणि खासदार गट यांचे नाही. भाजप नेते घोरपडे  राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या संपर्कात असतात. इस्लामपूरमध्ये होणार्‍या कार्यक्रमासही उपस्थित असतात.  

पक्षांतर्गत शिस्त, साधनसुचिता, निष्ठा, सेवाभाव आणि तत्वनिष्ठ राजकारण अशा गुणांचा सातत्याने जप करणार्‍या  भाजपचा सध्या जिल्ह्यात आकार मोठा झाला आहे.राष्ट्रवादीतून मोठ्या संख्येने आलेल्या नेते आणि कार्यकर्त्यामुळे जिल्ह्यात ‘शत प्रतिशत भाजप’ ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याचा खटाटोप सुरू आहे. मात्र या सगळ्या गदारोळात मूळचे भाजपचे कार्यकर्ते फारसे कुठे दिसत नाहीत. त्याचवेळी प्रचंड प्रमाणावर पक्षांतर होऊनही  ठिकठिकाणी शिल्लक राहिलेला राष्ट्रवादी पक्ष ताज्या हल्लाबोल यात्रेमुळे अधिक संघटित झाल्याचे दिसून येते आहे. हल्लाबोल यात्रेत भाजप सरकारवर टीकेचा भडिमार करण्यात आला, मात्र त्याला उत्तर देण्यास त्या पक्षातील फारसे कुणी पुढे सरसावले होते असे दिसले नाही. राष्ट्रवादीच्या तुलनेने काँग्रेसमधून फारसे पक्षांतर झालेले नव्हते. त्यामुळे त्या पक्षाचेही मोठे आव्हान सध्या भाजपसमोर  आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेची निवडणूक होते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, सुधार समिती, तिसरी आघाडी, स्वाभिमानी आघाडी रिंगणात उतरणार आहेत. सर्व प्रमुख पक्षातील जिल्हापातळीवरील गटबाजीचे पडसाद या निवडणुकीतही उमटणार यात शंका नाही. त्याचवेळी  इच्छुकांची मोठी संख्या ही सगळ्याच पक्ष आणि आघाड्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच संधीसाधू आयाराम-गयारामांचीही चर्चा सुरू झाली आहे. 

Tags : Sangli, Miraj, Kupwad Municipal Corporation issue