होमपेज › Sangli › मिरजेत अनेक उमेदवार सावकारांच्या दारात

मिरजेत अनेक उमेदवार सावकारांच्या दारात

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 12:05AMमिरज : जालिंदर हुलवान

निवडणूक  म्हणजे पैशांचा खेळ! अन हा खेळ आतापासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार सध्या सावकारांच्या सावकारी पाशात सापडू लागले आहेत. सांगली जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील काही सावकारांनी येथील उमेदवारांना आर्थिक पुरवठा सुरू केला आहे.   निवडणुकीत सारा खेळ हा पैशाचाच होणार हे निश्‍चित. पण निवडणूक यंत्रणा आता चांगलीच सज्ज झाली आहे. सांगलीत कालच साडे आठ लाख रूपये जप्त करण्यात आले. आता पोलिसांचीही नाकाबंदी सुरू आहे. सध्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, सुधार समिती, जनतादलाचे कार्यकर्ते त्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागले आहेत. येत्या चार दिवसांत प्रचाराची जोरदारपणे रणधुमाळीही सुरू होईल. 

वास्तविक मतदान याचा अर्थ विना मोबदला मत देणे असा आहे. अतिशय  श्रीमंत असणारा आणि अत्यंत गरीब असणार्‍या व्यक्तीच्या मताला तेवढीच किंमत आहे. पण सध्या मतदान हा शब्दच बाजूला पडू लागला आहे. सध्याच्या निवडणुकांमध्ये पैशाचाच खेळ केला जातो. तसा आरोप पक्षांकडूनही होऊ लागला आहे. 

1998 मध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका अस्तित्वात आली. पहिल्या निवडणुकीत जेवढा खर्च त्यावेळच्या उमेदवारांना आला होता. त्यापेक्षा कित्येक पट अधिक खर्च यंदाच्या निवडणुकीत येणार  आहे हे निश्‍चित. 
काही उमेदवारांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे. पण ज्यांच्याकडे पैसा नाही. त्यांना मात्र सावकारांनी हेरले आहे. मोठी टक्केवारी घेऊन या उमेदवारांना कर्जपुरवठा केला जात आहे. नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पण गेल्या एक दीड महिन्यांपासून उमेदवारांचा खर्च सुरू झाला आहे. जवळ असणारा पैसा संपल्यानंतर सवकारांकडून कर्ज म्हणून तो घेतला जात आहे. काहींनी आपल्या घरातील सोने, घराची कागदपत्रे या सावकारांकडे गहाण ठेऊन तर अनेकांनी मध्यस्थांच्या ( कमिशन एजंट) मार्फत कर्ज घेतले आहे. 

सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील बेकायदा सावकारी करणार्‍यांनी अनेक इच्छुक उमेदवारांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरूवात केली आहे. सांगली जिल्ह्याबरोबर इतर जिल्ह्यातीलही अनेक सावकारांनी येथील उमेदवारांना पैशाचा पुरवठा सुरू केला आहे. अगदी  कर्नाटकातीलही काही सावकारांनीही उमेदवारांना कर्ज पुरवठा केला आहे. पैसे देण्यासाठी आणि त्याची वसुली करण्यासाठी काही गुंडा  पुंडांची कमिशनवर नेमणूक करण्यात आली आहे.