Sun, May 26, 2019 00:46होमपेज › Sangli › अर्ध्या तासात चर्चेविना महासभा गुंडाळली

अर्ध्या तासात चर्चेविना महासभा गुंडाळली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

विकासकामांच्या फाईल अडविल्यावरून प्रशासनावर आगपाखड करीत गेल्या आठवड्यात महासभा तहकूब केली होती. सोमवारी ती तहकूब महासभा अजेंड्यावरील चर्चेविनाच अर्धा तासात गुंडाळली. सभा आटोपती घेण्यात बहुसंख्य मिरजकर सदस्य आघाडीवर होते. त्यानुसार महापौर हारुण शिकलगार यांनी हा निर्णय घेतला. पण मिरजेच्या कत्तलखान्याच्या ठेकेदारी रद्दचा एक (ज) खाली प्रस्ताव अजेंड्यावर होता. पण  त्या विषयावर ‘सामोपचाराने’ चर्चा टाळण्यासाठी सभा गुंडाळल्याची सदस्यांत चर्चा आहे. 

मागील सभेला आयुक्त जोपर्यंत विकासकामाच्या फाईली मार्गी लावत नाहीत, तोपर्यंत  महासभा होऊ देणार नाही, असा इशाराही सदस्यांनी दिला होता. त्यानुसार आज सभेच्या प्रारंभीच आयुक्त उपस्थित नसल्यावरून सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. विकासकामाच्या फाईलीवर सह्या करीत नाहीत, तोंडे पाहून फाईल मार्गी लावल्या जातात, असा आरोपही केला. 

यासंदर्भात फक्‍त मागील सभेवेळी उपोषण करणार्‍या सुरेखा कांबळे, विष्णू माने यांनीच याबद्दल विचारणा केली. पण त्यांना उत्तरे न देताच अजेंड्यावर चर्चा करा, असे म्हणत शिकलगार, प्रशासनाने बगलच दिली.

त्यानंतर  मिरजेतील मीरासाहब दर्गा उरूसासाठी दोन्ही बाजूने स्टॉल्स लावण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याबद्दल  तक्रारी सुरू झाल्या. यावरून सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान, संजय मेंढे, गटनेते किशोर जामदार यांनीही आवाज उठवला. जामदार म्हणाले, या ऐतिहासिक उरुसाला 600 वर्षाचा इतिहास आहे.  मिरजकरांचे ते ग्रामदैवत आहे. मात्र प्रशासनाने एका बाजूलाच दुकाने लावण्याचा निर्णय गेल्या वर्षीपासून सुरू केला आहे. जागा नाही म्हणून  पाळणे बसवायचे नाहीत. एकूणच उरुसाची परंपरा मोडित काढण्याची कोणी सुपारी घेतली आहे का? 

अनारकली कुरणे म्हणाल्या, पाण्याच्या व्यवस्थेसाठी पाचशे-पाचशे रुपये घेतले जातात. त्याची कसलीही पावती दिली जात नाही. सुरेश आवटी म्हणाले, प्रशासन आडमुठी भूमिका घेत पालिकेचे आर्थिक नुकसान करीत एकाच बाजूला दुकाने लावण्याचे आदेश देत आहे. त्यांच्याकडून नुकसान भरून घ्यावे. पारंपरिक पद्धतीने उरूस होऊ द्यावा.
अखेर शिकलगार यांनी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लावण्यास परवानगी देण्याची सूचना केली. ते म्हणाले, गेल्या 600 वर्षाची परंपरा असणार्‍या उरुसासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवा. त्याबाबत 31 मार्चरोजीच्या  महासभेला सविस्तर प्रस्ताव आणा.

विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी मागील महासभेत इतिवृत्तात आरक्षण उठविण्याच्या मंजूर विषयाला विरोध केला होता. त्यांनी घरे नसताना दीड एकर द्राक्षबाग आणि शाळेचे आरक्षण उठविण्याचा कारभार झाल्याचा आरोप केला. प्रशासनाने याबाबत पाहणी करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. परंतु त्यावर महापौर शिकलगार यांनी काहीच रुलिंग दिले नाही.

जगन्नाथ ठोकळे यांनी रखडलेल्या धोत्रेआबा घरकुल योजनेबाबत जाब विचारला. ते म्हणाले, गेल्या महिन्यांपूर्वी घरकुलांचे काम पूर्ण होऊनही धोत्रेआबा झोपडपट्टी स्थलांतर का होत नाही? यावर शिकलगार म्हणाले, संबंधित अधिकारी अपघातात जखमी झाले असल्याने काम थांबले आहे, ते रुजू होताच विषय मार्गी लावू.

एकूणच या चर्चेदरम्यान, गटनेते किशोर जामदार यांनी अन्य चर्चेवरून अजेंड्यावर विषय नेण्याची सूचना केली. त्यानुसार चर्चेतच सर्वांना अजेंडा मान्य असल्याचे सांगत मंजुरीही देण्यात आली. विष्णू माने यांनी मात्र विषयपत्रिकेवर चर्चा न करताच विषय गुंडाळल्याने विरोध केला, यातून गोंधळ निर्माण झाला.  या गोंधळातच महापौर शिकलगार यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर म्हणत महासभाच गुंडाळली.     

 

Tags: sangli, Sangli Miraj Kupwad Municipal Corporation, General Assembly, adjourned,


  •