Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Sangli › अमृत योजनेच्या वादावर आज फैसला

अमृत योजनेच्या वादावर आज फैसला

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 10:49PMसांगली : प्रतिनिधी

मिरजेच्या अमृत योजनेच्या वादावर मुंबईत उच्च न्यायालयात मंगळवारी फैसला होणार आहे. मनपा स्थायी समितीचे सदस्य किशोर लाटणे यांनी या योजनेची प्रक्रिया बेकायदेशीर झाल्याबद्दल दावा दाखल केला होता. न्यायालयानेही  शासनाला खुलासा करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी शासनाने नुकतेच प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. त्यामुळे याबाबत आज न्यायालयात  कोणता निर्णय होतो, यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

मिरजेसाठी 103 कोटींची अमृत योजना मंजूर झाली आहे. त्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार राबविली. वास्तविक ही प्रक्रिया आणि  ठेकेदाराला  वर्क ऑर्डरही महासभा आणि स्थायी समितीच्या परस्पर दिल्याचा आरोप होता. शिवाय स्थायी समितीने ठेकेदाराला वाढीव 8.66 टक्के जादा दराने निविदा मंजुरीस विरोध केला होता. तरीही त्याला मंजुरी दिली. ठेकेदाराने कामही सुरू केले आहे. यासंदर्भात वाढीव खर्चची जबाबदारी शासनाने घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याचा बोजा महापालिकेवर पडणार आहे.

याप्रकरणी लाटणे यांनी महापौर गटाच्यावतीने दावा दाखल केला होता.  गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रक्रिया बेकायदा असल्याबद्दल ताशेरे ओढले होते. मनपा प्रशासनावर ठपका ठेवला आहे. शासनाने  प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही दिले होते. नगरविकास मंत्रालयाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी खुलासा करणारे प्रतिज्ञापत्रही दाखल केले  आहे.
 

 

 

tags : Sangli,news, Miraj, Amrut, Yojana, Dispute, High ,court ,verdict,