Tue, Apr 23, 2019 02:12होमपेज › Sangli › सदाभाऊ यांनी त्यांचे काचेचे घर सांभाळावे : दिलीपराव पाटील

सदाभाऊ यांनी त्यांचे काचेचे घर सांभाळावे : दिलीपराव पाटील

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 10 2018 12:53AMसांगली :प्रतिनिधी

‘कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मला सोंगाड्या म्हणणे हा मोठा विनोद आहे. मी रात्रीच्या फुटाण्याला कधी स्पर्शही केलेला नाही. मी सुपारीचे खांडही खात नाही. मात्र सरकारी पैशावर रात्रीचे फुटाणे खाणार्‍यांचे घर काचेचे आहे. त्यांनी घराच्या काचा कशा शाबूत राहतील ते पहावे, असा गर्भित इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.  

पाटील म्हणाले, मी स्लॅबच्या घरात राहतो आहे. सदाभाऊंनी काचेचा बंगला बांधला आहे. सदाभाऊ हे राज्यमंत्री आहेत. ते अर्धेच मंत्री आहेत. कॅबिनेट बैठकीला बसण्याची परवानगीही त्यांना नसते. मात्र आव मोठा असतो. मी चाळीस वर्षे राजकीय जीवनात काम करीत आहे. रात्रीच्या फुटाण्याला कधी स्पर्शही केलेला नाही. मला कोणतेही व्यसन नाही. सरकारच्या पैशांवर ते रात्रीचे फुटाणे खातात. रात्रीचा फुटाणा त्यांनाच माहीत. 

‘फुटाणा मंत्री’ त्यांना कळाला नाही

खरे तर मी म्हटलेला ‘फुटाणा मंत्री’  या वाक्याचा अर्थ सदाभाऊंना कळाला नाही. भट्टीत घातल्यानंतर फुटाणा टणाटणा उड्या मारत असतो. तसे सत्तेची ऊब मिळाल्यावर सदाभाऊ टणाटणा उड्या मारीत आहेत. मला अपेक्षित असलेला फुटाणा हा सत्तेच्या ऊबीने टणाटणा उड्या मारणारा आहे. पण सदाभाऊंनी वेगळाच अर्थ काढला आहे. त्यांना तोच फुटाणा माहिती असावा, असा टोला पाटील यांनी लगावला. 

पाटील म्हणाले, तुमचे चारित्र्य काय हे मी काय सांगणार? ते सर्वांना माहिती आहे. काचेच्या घरात राहणार्‍यांनी इतरांच्या घरावर दगड मारू नयेत असा सल्ला ते देत आहेत, पण सदाभाऊंचेच घर काचेचे आहे.  घराच्या काचा कशा शाबूत राहतील हे त्यांनी पहावे. त्यांनी काचेचा बंगला शाबूत ठेवावा. इस्लामपूर येथे हल्लाबोल सभेला उपस्थित असलेली गर्दी उत्स्फूर्त होती. त्यामुळे विरोधकांची घोर निराशा झाली आहे. त्यातून ते काहीही बोलत आहेत. 
 

 

tags : Sangli,news, Minister ,Sadabhau, Khot, save, his, mirier, home,