Thu, Jun 27, 2019 09:58होमपेज › Sangli › रांजणीतील ड्रायपोर्टमुळे सांगली जगाच्या नकाशावर

रांजणीतील ड्रायपोर्टमुळे सांगली जगाच्या नकाशावर

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 12:43AM सांगली : प्रतिनिधी

इंटरनेटमुळे संपूर्ण जग एक झाले आहे. स्वस्त माल कोठे मिळतो, याचा शोध सर्वजण घेत आहेत. त्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट झाल्यास सांगली जगाच्या नकाशावर येईल. शेती, उद्योग, व्यापार  याला चालना मिळेल. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल, असा सूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उमटला. रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्टट्रस्टचे व्यवस्थापक एन. ए. देशपांडे, सहव्यवस्थापक आर. बी. जोशी तसेच सल्लागार समितीने शुक्रवारी जागेची पाहणी केली. त्यानंतर आज व्यापारी, उद्योजक, शेतकरी प्रतिनिधी यांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. 

बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, माजी अध्यक्ष मनोहर सारडा, सांगली बाजार समितीचे सभापती तानाजी पाटील, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी, कुपवाड एमआयडीसीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, मनोज मालू, भाजपच्या नीता केळकर, दीपक शिंदे -म्हैसाळकर, अशोक मगदूम, निवासी जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी  रांजणी येथील प्रकल्पाचे प्रोजेक्टवर सादरीकरण करण्यात आले.  खासदार पाटील म्हणाले,  रांजणीतील जागा उपयुक्त आहे. रस्ते, पाणी  आणि रेल्वे  या सुविधा जवळ आहेत.

राज्यातून सध्या 45 लाख कंटेनर मुंबईतून परदेशात जातात. मुंबईत हा माल घेऊन जाण्यासाठी वेळ, पैसे खर्च होतात. त्याशिवाय वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रदुषण वाढते.    त्यासाठी हे केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. सुमारे दोनशे ते पाचशे किलोमीटर परिसरातील  क्षेत्र या पोर्टला जोडले जाणार आहे. त्यामुळे या केंद्राच्या परिसरात प्रक्रिया उद्योग सुरू होतील. रोजगार वाढले.
शरद शहा म्हणाले, सांगली बाजारपेठेत हळद, बेदाणा, गूळ, मिरची, मका आदी शेतीमाल मोठ्या प्रमाणात येतो. जिल्ह्याच्या पूर्वभागात पाणी योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे  शेतीमाल उत्पादनात वाढ होणार आहे. सोलापूर, विजापूर आणि कोल्हापूर परिसरातील शेतमाल या ठिकाणी येऊ शकतो. 

मनोहर सारडा म्हणाले, हे पोर्ट झाल्यास विविध उद्योगांना चालना मिळेल. आपला माल थेट जगाच्या बाजारपेठेत जाईल. मधले एजंट कमी होतील. त्यामुळे खर्चात बचत होऊन शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळतील. बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले, सध्या मुंबईला माल पोहोचविल्यानंतर 60 टक्के गाड्या रिकाम्या परत येतात. कंटेनर रेल्वेतून गेल्यास प्रवास खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. 
नेहरू पोर्टट्रस्टचे व्यवस्थापक एन. ए. देशपांडे म्हणाले, पुढील 40 वर्षाचे नियोजन करून हे केंद्र उभारण्यात येणार आहे. ड्रायपोर्टमुळे आयात-निर्यात वाढेल. उद्योगधंदे वाढीस लागतील.  रोजगार उपलब्ध होतील.