होमपेज › Sangli › सरकारच्या धोरणाने कष्टकर्‍यांचे शोषण

सरकारच्या धोरणाने कष्टकर्‍यांचे शोषण

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 9:03PMसांगली : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या धोरणामुळे अल्पसंख्यांक, कष्टकरी, दलित, शेतकरी, शेतमजूर अशा उपेक्षित लोकांचे शोषण सुरू आहे. हा वर्ग एकत्र येऊ नये, यासाठी हेतूपूर्वक जातीय, धार्मिक हिंसाचाराचे विष पेरले जात आहे. त्यामुळे भारताची राज्यघटना, लोकशाही धोक्यात येत आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस आणि माजी खासदार सीताराम येचुरी यांनी केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 22 वे राज्य अधिवेशन येथील मराठा समाज भवनमध्ये सुरू झाले. त्याचे उद्घाटन येचुरी यांच्याहस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. तीन दिवस चालणार्‍या या अधिवेशनास  आमदार जयंत पाटील, माजी आमदार नरसय्या आडम, प्राचार्य व्ही. वाय. पाटील, अशोक ढवळे, सुधा सुंदररामन, सुभाष पाटील, उमेश देशमुख आदी उपस्थित आहेत. राज्यभरातील 400 हून अधिक प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित राहिले आहेत. 

येचुरी म्हणाले, इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळत असताना मुस्लिमांना  ज्याप्रमाणे धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र मिळाले. त्या प्रमाणे उपेक्षितांचे शोषण करण्यासाठी धर्माच्या आधारावर हिंदुस्थानची मागणी केली गेली. मात्र ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता सत्ता मिळाल्यानंतर शोषण करणारी व्यवस्था पुन्हा निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. गरीब अधिकच गरीब होत असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. देशाच्या विकास दरात 1 टक्के लोकाकडे 73 टक्के संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा उपेक्षित वर्ग एकत्र येऊ नये, यासाठी जाती, धर्माचे धु्रवीकरण केले जात आहे. त्यातून देशाची एकता आणि अखंडता , राज्यघटना धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सध्याची राज्यघटना मान्य नसल्याचे सांगत ती बदलण्याची भाषा केंद्र सरकारमधील  मंत्रीच करीत आहेत. ते म्हणाले, सध्याच्या न्यायव्यवस्थेतसुद्धा असंतोष वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश सरकारच्या विरोधात लोकांसमोर येत आहेत. दिवाळखोरीतील बँका वाचविण्यासाठी सामान्यांचे शोषण केले जात आहे. कामाचे तास वाढविले जात आहेत. निवृत्तीवेतन कमी केले जात आहे. सार्वजनिक क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवून हे क्षेत्रच बंद पाडण्याचा डाव आखला जात आहे. खासगी क्षेत्रामुळे सर्व सत्ता मूठभरांच्या  हातात जात आहे. कामगार कायदे बदलले जात आहेत. डिजिटलद्वारे पैसे हस्तांतरणामुळे ठराविक कंपन्यांना कोट्यवधीचा  फायदा होत आहे. शेतकर्‍यांवर जमिनी उद्योजकांना विकून अन्नधान्य विकत घेण्याची वेळ आणली जात आहे.  जीएसटी, नोटाबंदीमुळे छोटे व्यापारी, दुकानदार उद्ध्वस्त झाले आहेत. या सर्वांच्या विरोधात आपण एकत्र येण्याची गरज असल्याचे ते शेवटी म्हणाले. सुरुवातीस स्वागताध्यक्ष व्ही. वाय. पाटील यांचे भाषण झाले. 

सांगलीत अवघा लाल माहोल

अधिवेशनानिमित्ताने लाल झेंडे, कमानी यामुळे शहरात सारा लाल  माहोल  झाला आहे. अधिवेशनस्थळाला कॉ. कार्ल मार्क्सनगर नाव देण्यात आले आहे. दोन स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. एका बाजूस क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी तर दुसर्‍या बाजूस क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड प्रवेशव्दार असे नाव देण्यात आले आहे. सभागृहास क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अशी नावे देण्यात आली आहेत. अधिवेशनस्थळी मुख्य मंचास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  तर जाहीर सभेच्या मंचास छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच असे नाव देण्यात आले आहे.


दोन कोटी रोजगार देणारे पकोडे तळण्याची भाषा करतात सीताराम येचुरी म्हणाले, मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र कोणतीच आश्‍वासने पूर्ण झाली नाहीत. या उलट प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देतो, असे सांगणारे आता पकोडे तळा, असे सांगत आहेत. खोटी आश्‍वासने देऊन लोकांची फसवणूक केली जात असल्याचा त्यांनी आरोप केला.