Wed, Jul 24, 2019 12:52होमपेज › Sangli › सांगलीत जलसमाधी आंदोलन

सांगलीत जलसमाधी आंदोलन

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 26 2018 1:39AMसांगली : प्रतिनिधी

काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जलसमाधी घेतली. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीत बुधवारी कृष्णा नदीपात्रात प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन करण्यात आले. शासनाने निर्णय न घेतल्यास निवडणुकीत धडा शिकविण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी शिंदे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याची शपथ घेण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी  मंगळवारी बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे कृष्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. माई घाटावर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सकाळी साडेदहाच्या सुमारास आंदोलक स्वामी समर्थ मंदिराजवळ जमा झाले. त्यानंतर घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू झाले. पन्‍नासहून अधिक कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक जलसमाधी घेतली.  डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, 

महेश खराडे, सतीश साखळकर, अविनाश जाधव, श्रीरंग पाटील, शिवराज पाटील, अरुण कणसे, राहुल पाटील, योगेश पाटील, संभाजी पोळ, आसिफ बावा, विजय पाटील, अंकित पाटील, धनंजय वाघ  यावेळी उपस्थित होते. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अशोर वीरकर, निरीक्षक रवींद्र डोंगरे, रवींद्र शेळके यांनी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सुमारे तासभर प्रतीकात्मक जलसमाधी घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

भाजपला अरबी समुद्रात जलसमाधी देणार...

मराठा समाजाला आरक्षण न दिल्याने भाजप सरकारविरोधात समाजाच्या भावना तीव्र आहेत. आरक्षणाच्या आंदोलनात आतापर्यंत दोघांचे बळी गेले आहेत. तरीही शासनाला जाग येत नाही. मूक मोर्चे ज्याप्रमाणे यशस्वी केले, त्याप्रमाणे ठोक मोर्चे यशस्वी करून शासनाला आरक्षण देण्यास भाग पाडण्यात येईल. शासनाने आरक्षण न दिल्यास 2019 च्या निवडणुकीत भाजपलाच अरबी समुद्रात जलसमाधी देण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.