Mon, Apr 22, 2019 03:54होमपेज › Sangli › सांगली - इस्लामपूर रस्ता पुन्हा धोकादायक

सांगली - इस्लामपूर रस्ता पुन्हा धोकादायक

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 23 2018 8:15PMकवठेपिरान : वार्ताहर 

सांगली - इस्लामपूर रस्ता पुन्हा वाहतुकीस धोकादायक बनला आहे. काही ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्ता हरवून गेला आहे. या धोकादायक रस्त्याबद्दल अनेकदा आंदोलन झाले. यामुळे शासनाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 12 कोटीचा निधी मंजूर केला. तीन महिन्यांपूर्वी त्याची निविदाही काढण्यात आली. परंतु अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. सांगली - इस्लामपूर रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. लक्ष्मी फाटा, कसबे डिग्रज, तुंग फाट्याजवळ रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होतो आहे. वाहनचालकांना तर जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे  लागत आहे. 

गेल्या दिवाळीपूर्वी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी कृती समितीच्या माध्यमातून रस्त्याचा पंचनामा केला. आंदोलन केले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पॅचवर्कच्या नावाखाली मलमपट्टी केली. त्यानंतरही लोकांचा रोष पाहून लोकप्रतिनिधींनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे वर्ग केला. त्याअंतर्गत  डिसेंबरमध्ये  या रस्त्याच्या कामाची 12 कोटीची निविदाही काढण्यात आली. पण तीन महिने उलटूनही अद्याप ते काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासन किती जागृत आहे, हे दिसत असल्याचे बोलले जात आहे. 

वास्तविक सांगली - पेठ रस्ता शहराला जोडणारा दुवा मानला जातो. याच रस्त्यावरून  पुणे-मुंबईच्या लांब पल्ल्याच्या तसेच आसपासच्या गावांची सर्व वर्दळ होते. आसपासच्या ग्रामस्थांना नोकरी, बाजारासह विविध कारणांनी रोज सांगलीला ये-जा करावी लागते. पण या खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. वास्तविक या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक नेतेमंडळींनी फक्त आश्वासनांची खैरात केली आहे.  मात्र प्रत्यक्ष कामाकडे दुर्लक्षच केले आहे. पुन्हा आंदोलन उभारण्यापूर्वी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी हा रस्ता तत्काळ दुरुस्त करून अपघाताचा सापळा दूर करावा, अशी मागणी होत आहे.

Tags : Sangli, Sangli News, Sangli, Islampur, road, dangerous again