Tue, Dec 10, 2019 12:38होमपेज › Sangli › सांगलीत ईमूची तस्करी उघड

सांगलीत ईमूची तस्करी उघड

Published On: Dec 16 2017 1:47AM | Last Updated: Dec 16 2017 1:47AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर रस्त्यावर दूरदर्शन केंद्राजवळ इमू पक्ष्याची तस्करी करणारे पाच जण मारुती कार सोडून पळून गेले. त्यावेळी कारपासून काही अंतरावर लपलेल्या ईमूला पोलिसांनी ताब्यात घेऊन प्राणीमित्रांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

शुक्रवारी सकाळी दूरदर्शन केंद्राजवळ विनानंबर प्लेटची एक मारुती कार थांबल्याची माहिती पोलिसांना तेथील नागरिकांनी दिली.  पोलिस घटनास्थळी पोहोचताच ही घटना पाहणार्‍यांनी ईमूच्या तस्करीबाबत माहिती दिली. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास पाच जण या कारमधून ईमू पक्षी घेऊन निघाले होते. दूरदर्शन केंद्राच्या थोडे पुढे गेल्यानंतर ईमूची धडपड वाढल्याने ते थांबले. तसेच कारही बंद पडल्याने ते खाली उतरले. तेथे जवळच असलेल्या एका दुकानाच्या सुरक्षारक्षकासह तिघे जण त्यांच्याकडे जाऊ लागले.

त्या तिघांना येताना पाहून पाचही जण तेथून पळून गेले. यादरम्यान अंधारात ईमूही पळून गेला.  दरम्यान, शुक्रवारी सकाळी पोलिसांनी परिसरात तपासणी केल्यानंतर एका शेतात ईमू लपल्याचे आढळले. कारची तपासणी केल्यानंतर मागील सीटवर ईमूचे पंख पडलेले दिसले. पोलिसांनी कार जप्त केली असून, ईमू पक्षी प्राणीमित्रांच्या ताब्यात दिला आहे. दरम्यान, ईमूची तस्करी केली जात होती की, तो चोरून आणलेला होता याबाबत पोलिस तपास करीत आहेत.