Fri, May 24, 2019 09:25होमपेज › Sangli › सर्वच कार्यालयांत शुकशुकाट ; नागरिकांचे हाल    

सांगली : सरकारी कर्मचारी संपावर      

Published On: Aug 07 2018 6:39PM | Last Updated: Aug 07 2018 6:45PMसांगली : प्रतिनिधी

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी, अंशदायी पेन्शन योजना, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार सरकारी, निमसरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवसाच्या संपावर गेले. त्यामुळे बहुतेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात दिवसभर शुकशुकाट होता. याचा जिल्हाभरातील नागरिकांना चांगलाच फटका बसला. 

कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.  त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना देण्यात आले. आंदोलनात शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संघटना पदाधिकार्‍यांनी केला  आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांच्या या काम बंद आंदोलनामुळे कार्यालयात कामांसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले. 

सातवा वेतन आयोग, अंशदायी पेन्शन योजना, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय विनाअट 60 वर्षे करा आदी मागण्यांसाठी हा संप सुरू करण्यात आला आहे.  दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता शासकीय कर्मचारी विश्रामबाग येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. तेथून  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी डी. जी. मुलाणी म्हणाले,   चार वर्षापासून विविध आंदोलन केल्यानंतर आतापर्यंत अनेकवेळा चर्चा झाली. मात्र निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. आमच्या आंदोलनास सर्व कर्मचारी संघटनांचा पाठिंबा आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे 911 पैकी 820 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट होता.