होमपेज › Sangli › शासकीय कार्यालये होणार पेपरलेस

शासकीय कार्यालये होणार पेपरलेस

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:40AM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच जिल्ह्यातील दहा तहसील आणि पाच प्रांतकार्यालयातील कारभार आता पेपरलेस होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू  आहे. जानेवारीअखेर ही प्रक्रिया पूर्ण होणार असून आयएसओ मिळवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयात गेल्यानंतर कोणतेही काम त्वरित होत नाही. किरकोळ कामासाठी सुद्धा अनेक फेर्‍या माराव्या लागतात, असा आतापर्यंत बहुसंख्य लोकांचा अनुभव असतो.   अनेकांची वर्षानुवर्षे कामे होत नाहीत. प्रशासनाची ही प्रतिमा बदलण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात येत आहे. 

आता कोणत्याही कामासाठी अर्ज आल्यानंतर त्याचा प्रवाससुद्धा ऑनलाईन दिसणार आहे. अर्ज नेमका कोणत्या ठिकाणी आहे ते समजेल. त्यावर सही करण्यासाठी संबंधीत अधिकारी शासकीय कार्यालयात असलाच पाहिजे याचे बंधन असणार नाही.  प्रवासात किंवा बाहेरही त्या अर्जावर सही करता येणार आहे. अर्जाचा प्रवास, कोणत्या टेबलवर किती कालावधी लागला अशी माहिती  अर्जदाराला मिळणार आहे. सर्व प्रवास ऑनलाईन असल्याने मंजुरीची वेळ, तारीख सुद्धा कळणार आहे. त्यामुळे संबंधीत अधिकारी, कर्मचार्‍यास कामाबाबत सबबी सांगता येणार नाहीत. एका अधिकार्‍याची मंजुरी घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कंम्प्युटर फोल्डरमध्ये हा अर्ज जाणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे टेबलवरून होणारा फाईलचा प्रवास आता बंद होणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालय, पाच प्रांत आणि दहा तहसीलदार कार्यालयात असलेली सुमारे 1 कोटी 6 कागदपत्रे स्कॅन करण्यात आली आहेत. ही सर्व कागदपत्रे नागरिकांना पाहण्यासाठी सार्वजनिक ( खुली) करण्यात आली आहेत. पूर्वी उतारे, दाखल मिळवण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात फेर्‍या माराव्या लागत होत्या. आता ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय सर्व रेकॉर्ड कोणत्या ठिकाणी आहे  याची माहितीही संगणकावर असणार आहे. त्यामुळे कागद, फाईल सापडत नाही, अशी सबब यापुढे सांगता येणार नाही. नागरिकांना एकूण 33 प्रकारचे दाखले घर बसल्या उपलब्ध होणार आहेत. प्रशासनाने स्वमूल्यांकन सूरू केले असून आयएसओ मानांकन घेण्यात येणार आहे. त्यासाठी बैठका सुरू असून युद्धा पातळीवर काम सुरू आहे.