सांगली : प्रतिनिधी
शहरातील कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाट परिसरात स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सहा महिन्यांची पूर्ण वाढ झालेले नाळेसह अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गावभागातील विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते रोज कृष्णा नदीची साफसफाई करतात. चव्हाण दोन दिवसांपासून स्वामी समर्थ घाट परिसरात नदीतील कचरा काढण्याचे काम करीत होते. दोन दिवसांपासून ते अर्भक घाट परिसरात तरंगत होते. मात्र बाहुली समजून चव्हाण यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सोमवारी सकाळी मृत अर्भकाचा रंग काळा-निळा पडल्याने त्यांना शंका आली. त्यांनी तातडीने ते अर्भक नदीतून बाहेर काढले.
त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान चव्हाण यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांचीच उलट तपासणी घेतल्याने चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान हे अर्भक कोणाचे आहे तसेच ते कोणी टाकले याबाबत तपास सुरू आहे. याप्रकरणी शहरातील विविध मॅटर्निटी हॉस्पीटलमध्येही चौकशी करण्यात येणार आहे. शिवाय अशा तर्हेने बेकायदेशीररित्या अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाईही करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले.
अर्भक ठेऊन पोलिस गायब
दरम्यान पंचनाम्यानंतर ताब्यात घेतलेले अर्भक घेऊन पोलिस सिव्हीलमधील उत्तरीय तपासणी कक्षात गेले. तेथे अर्भक असलेली पिशवी ठेवून लगेच येतो असे सांगून गेलेले पोलिस दुपारीच परतले. त्यामुळे सिव्हीलमधील कर्मचार्यांना त्यांचा वाट पहात बसावे लागले. दरम्यान कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ते गेले होते असे निरीक्षक शेळके यांनी सांगितले.
महिला दिनी घटना घडल्याची शक्यता...
दरम्यान कृष्णा नदीवरील नवीन पुलावरून हे अर्भक नदीत टाकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय गेल्या चार दिवसांपासून हे अर्भक पाण्यात तरंगताना दिसत होते. त्यामुळे महिला दिनीच ही घटना घडली असल्याची शक्यता संजय चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात कुपवाड येथील एकाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेहही याच नवीन पुलावरून नदीत टाकण्यात आला होता. त्यामुळे या पुलाजवळ महापालिकेने सीसीटीव्ही बसविण्याची मागणी जोर धरत आहे.