Mon, Mar 18, 2019 19:38होमपेज › Sangli › जिल्हा नियोजनच्या सभेत नेत्यांतच जुंपली

जिल्हा नियोजनच्या सभेत नेत्यांतच जुंपली

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 04 2018 12:13AMसांगली : प्रतिनिधी

येथे जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राजकीय नेत्यांच्यातच जुंपली. जत येथील रोहयोची बिले काढण्यावरून आमदार विलासराव जगताप, त्यांचे समर्थक आणि काँग्रेस नेते विक्रम सावंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या प्रश्‍नासाठी  नंतर बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे सांगून या वादावर पडदा टाकण्यात आला. दरम्यान, जिल्हा नियोजनचा सर्व निधी खर्च न झाल्याने आणि इतर कारणासाठी वन, समाजकल्याण, आरोग्य, कृषी, महावितरण या विभागाच्या अधिकार्‍यांना सदस्यांनी धारेवर धरले. 

पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनच्या सभागृहात ही सभा झाली. खासदार संजय पाटील,  खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, आमदार मोहनराव कदम, विलासराव जगताप, अनिलराव बाबर, शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, माजी आमदार अजितराव घोरपडे, दिनकर पाटील, महापालिका आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आदी उपस्थित होते. 

आमदार जगताप म्हणाले, रोजगार हमी योजनेतील कामाची बिले अद्याप मिळालेली नाहीत. किमान झालेल्या कामाची तरी बिले मिळावीत. त्यावर संबंधित अधिकार्‍यांनी कुशल आणि अकुशलचा मुद्दा उपस्थित करीत ठरलेल्या 40-60 प्रमाणातच बिले काढता येतात, असे सांगितले. त्यावर जगताप यांनी प्रत्येक वेळी तुम्ही वेगवेगळी कारणे का सांगता, असे विचारले. त्यावर विक्रम सावंत म्हणाले, कुशल आणि अकुशल प्रमाणाचा मुद्दा जुनाच आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार आहे. अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले आहेत. त्यामुळे बिले काढण्यासाठी घाई न करता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.

त्यावर आमदार जगताप यांनी हे उत्तर देणारे कोण, याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी बोलावे, असे सांगितले. त्याचवेळी  जगताप यांचे समर्थक जिल्हा परिषद सभापती तमनगोंडा रवी पाटील, सरदार पाटील, उमेश सावंत हे ही आक्रमक झाले. जोरदार वादावादी सुरू झाली. 

आमदार जगताप बोलण्यास उभे राहिल्यानंतर सावंत आडवे येतात, असा आरोप सरदार पाटील यांनी केला. त्यावर हे शहाणपण शिकवायचे नाही, असे प्रतिउत्तर सावंत यांनी दिले. त्यावेळी पालकमंत्री देशमुख आणि खासदार पाटील यांनी या प्रश्‍नासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊ, असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकला. 

कडेगाव येथे वनविभागातील 90 लाखाच्या कामातील अपहाराबाबत संबंधित अधिकार्‍यांनी चौकशी करुन सांगतो, असे सांगताच पालकमंत्री देशमुख यांनी प्रत्येकवेळी चौकशी करतो, हे उत्तर बरोबर नाही, असे सांगत अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले.

कोसारी, कुंभारी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत 6 कोटीचा घोटाळा झाला आहे. 60 टक्के बिले तरी गावात अद्याप नाही, असा मुद्दा स्नेहलता जाधव यांनी उपस्थित केला.  त्यावर देशमुख यांनी संबंधित अधिकार्‍यांना चुकीचे समर्थन का करता. वस्तुस्थिती सांगा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. 

आमदार विश्‍वजित कदम यांनी वांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. त्यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देशमुख   आणि राजाराम गरूड यांनी याबाबतचा खुलासा केला. 

खासदार पाटील यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरीत विद्युत पोल खरेदीचे टेंडर रद्द  का केले, याचा जाब विचारला. सोलापूरच्या व्यक्‍तीसाठी असा प्रकार होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला. 

समाजकल्याण विभागाचा निधी अत्यल्प खर्च झाला आहे. त्यामुळे अनेक सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का मिळत नाही, प्रत्येक विभागाचा आढावा घेतला का, दरमहा कामाचा आढावा घ्या, अशा सूचना दिल्या. 

ग्रामपंचायतीमधील एलईडी बल्ब  घोटाळ्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला. त्यात  एका एलईडीची किंमत 9 हजार रुपये कशी, दुरुस्तीचा खर्च 7 लाख रुपये, टेंडरशिवाय कशी काय कामे होतात, हे मुद्दे उपस्थित झाले. त्यावर  अधिकार्‍यांनी संबंधित ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत. खुलासा आल्यानंतर महिन्यात  कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. 

नगरसेविका मृणाली पाटील यांनी महापालिका क्षेत्रातील अंडरग्राऊंड वीज पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महावितरणच्या अधिकार्‍यांनी दहा कोटी रुपये आले आहेत. मात्र महापालिकेकडून खोदाईसाठी परवानगी मिळत नसल्याचे सांगितले. त्यावर आयुक्‍त खेबूडकर यांनी लवकरच परवानगी देण्यात येईल, असे सांगितले. आमदार खाडे म्हणाले, पाणी आहे, मात्र वीज कनेक्शन नसल्याने पिके वाळत आहेत. त्याची भरपाई महावितरण देणार का? असा सवालही त्यांनी केला. 

शिवसेनेचे बजरंग पाटील यांनी सांगली- तासगाव रस्त्यावरील बुधगाव आणि कवलापूर येथील बायपास रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला. खा. शेट्टी यांनी तुंग ते सांगली रस्ता सतत खराब का होतो? अशी विचारणा केली.