होमपेज › Sangli › एकशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या कामांची श्‍वेतपत्रिका काढा

एकशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या कामांची श्‍वेतपत्रिका काढा

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:26AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

तब्बल 188 कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याचा दावा करणार्‍या आयुक्‍तांनी त्या कामांची श्‍वेतपत्रिका काढावी. किती कामांच्या वर्क ऑर्डर दिल्या, त्यापैकी किती कामे झाली, ही माहिती जनतेसमोर जाहीर करावी,  असे आव्हान राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी पत्रकार बैठकीद्वारे आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांना दिले. आठवड्यापूर्वी विकासकामे मार्गी लावण्याचा राष्ट्रवादीने अल्टिमेटम दिला होता. मात्र कामे मार्गी  न लावल्याबद्दल बुधवारपासून महापालिकेच्या दारात सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मोहिते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून खेबुडकर यांनी विकासकामांना खो घालण्याचाच उद्योग केला आहे. त्यामुळे शहराची विकासकामे खुंटली आहेत. याबाबत आम्ही वारंवार पाठपुरावा केला, विनंतीही केली. तरीही त्यांनी याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शहराचे वाटोळे होऊ लागले आहे. जनता आता आम्हाला जाब विचारत आहे. 

ते म्हणाले, गेल्या आठवड्यात आम्ही  खेबुडकर यांना भेटून विकासकामे मंजूर करा,  अशी मागणी केली होती. कामे सुरू करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु आयुक्‍तांनी आजअखेर काहीच केले नाही.

ते म्हणाले, उलट 188 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यासंदर्भात आजही आम्हाला पत्र दिले आहे. वास्तविक 188 कोटी रुपयांची शहरात कामे झाली असती तर एकही खड्डा पहायला मिळाला नसता. त्यामुळे किती कामे झाली, वर्क ऑर्डर किती दिल्या, हे जाहीर करावे. मोहिते म्हणाले, त्यामुळेच जोपर्यंत विकासकामे मंजूर होऊन सुरू होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाही. महापालिकेच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत दररोज सत्याग्रह आंदोलन करू. यामध्ये सर्वच नगरसेवक, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.