Mon, Aug 19, 2019 01:42होमपेज › Sangli › गावात स्वच्छता अभियान; ‘झेडपी’त पिचकार्‍या

गावात स्वच्छता अभियान; ‘झेडपी’त पिचकार्‍या

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:38AM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

जिल्ह्यात गुरूवारी सर्व गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे  निर्देश होते. त्यानुसार गावांमध्ये स्वच्छता कार्यक्रम राबविले. जिल्हा परिषदेत मात्र नेहमीप्रमाणे तंबाखु, गुटखा खाणार्‍या कर्मचार्‍यांचे खिडक्यांमधून पिचकार्‍या मारणे सुरू होते. तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. आता तंबाखु, मावामुक्त कार्यालय हे अभियान सुरू करण्याची गरज भासत  आहे.  देशात दि. 4 जानेवारी 2018 हा दिवस स्वच्छता सर्वेक्षण दिवस म्हणून राबविण्याचे शासन निर्देश होते. त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत खासदार संजय पाटील यांनी कळविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने पंचायत समित्यांना आणि पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतींनी कळवले होते.

स्वच्छता शपथ, स्वच्छता फेरी, गृहभेट, गावात परिसर स्वच्छता, शाळांमध्ये परिसर स्वच्छता व हातधुवा उपक्रम, अंगणवाडी तसेच गावातील शासकीय व निमशासकी कार्यालये, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्याबाबत ग्रामपंचायतींना निर्देश दिले होते. त्यानुसार कमी-जास्त प्रमाणात हे उपक्रम राबविले जात होते.  जिल्हा परिषदेत मात्र वेगळेच चित्र दिसत होते. तंबाखु, मावा खाणारी कर्मचारी मंडळी स्वच्छतागृहातील बेसिनमध्ये पिचकारी मारून जात होते. काही मंडळी तेवढीही तसदी घेत नव्हते. सरळ खिडकीतून पिचकारी मारत होते.   गावात स्वच्छता अभियान आणि जिल्हा परिषदेत पिचकार्‍या, अशी काही स्थिती दिसत  होती. 

सलाम बॉम्बे आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून तंबाखुमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. जिल्हा परिषदेच्या 1 हजार 702 पैकी सुमारे 1 हजार 360 शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. जानेवारीअखेरपर्यंत सर्व शाळा तंंबाखुमुक्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणीही होणार आहे. त्या धर्तीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालय तंबाखुमुक्त अभियान राबविण्याची गरज आहे. प्रशासनाने त्यामध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे.