Tue, Mar 19, 2019 03:14होमपेज › Sangli › ‘पीएम’ रूमचे पोस्टमार्टम कधी

‘पीएम’ रूमचे पोस्टमार्टम कधी

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 8:57PMसांगली : अभिजित बसुगडे 

सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलच्या (पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय) समस्या सुटता सुटत नसल्याचे दिसत आहे. येथे असणारे शवविच्छेदन गृह अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. याच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शिवाय  शवागारही बंद  आहे.  इमारतीच्या दुरूस्तीसाठी आलेला 23 लाखांचा निधी अजूनही पडून आहे. याकडे सिव्हिल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  या पीएम रूमचेच पोस्टमार्टम करण्याची वेळ आली आहे. दक्षिण महाराष्ट्रासह कर्नाटक, कोकणातून रूग्ण सिव्हिलमध्ये उपचारासाठी येतात. येथील उपचारांची गुणवत्ता चांगली असल्यानेच येथील बाह्यरूग्ण विभागात रोज सरासरी हजार ते बाराशे रूग्ण तपासले जातात.

त्याशिवाय जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेर झालेल्या अपघात, खून यातील मृतांची उत्तरीय तपासणीही येथेच केली जाते. त्यासाठी असणार्‍या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तेथे कोणत्याही प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. तरीही तेथील कर्मचारी निमूटपणे काम करताना दिसत आहेत. या इमारतीचे छत बारा महिने गळत असते. तपासणीसाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी इमारतीच्या वरच टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीतील पाणी या इमारतीतच गळते. कर्मचार्‍यांसाठी असणार्‍या खोलीचीही दुरवस्था झाली आहे.  याबाबत कर्मचार्‍यांनी सातत्याने इमारतीच्या डागडुजीबाबत वरिष्ठांना सांगूनही  दुर्लक्ष केले जाते.

 इमारतीकडे सीएमओ (कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर) शिवाय कोणताही डॉक्टर फिरकत नसल्याचे दिसून येते. इमारतीत मृताच्या नातेवाईकांना बसण्यासाठी असणारी खोली नेहमीच बंद असते. नातेवाईक बाहेर ताटकळत उभारतात. खिडकीच्या काचाही गायब झाल्या आहेत. त्यामुळे उत्तरीय तपासणी कोणीही बाहेरून सहज पाहू शकतो. त्याचे छायाचित्रण करू शकतो.    कर्मचार्‍यांसाठीच्या खोलीची दुरवस्था झाल्याने रात्रपाळीसाठी असणारा कर्मचारी सिव्हीलच्या मुख्य  व्हरांड्यात झोपलेला  दिसून येतो. निधी परत जाण्याची शक्यता  शवविच्छेदन गृहाच्या दुरूस्तीसाठी 23 लाखांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. तो प्रशासनाकडे जमाही झाला आहे. मात्र तो खर्च करण्यात आलेला नाही.