Wed, Aug 21, 2019 15:19होमपेज › Sangli › भाजप हटाओ देश बचाओ

भाजप हटाओ देश बचाओ

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 10:53PMसांगली : प्रतिनिधी 

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात  काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज स्टेशन चौकात धरणे आंदोलन केले. भाजप देशात जातीयवादाचे विष पसरवत असल्याची टीका या वेळी अनेक पदाधिकार्‍यांनी केली. ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ यासह अन्य घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजपवर टीकेचा भडीमार केला.  युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम म्हणाले,  देश व राज्याच्या अनेक भागात जातीयवादाच्या विविध घटना सतत घडत आहेत. त्या माध्यमातून गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न सरकार करते. माजी खासदार प्रतीक पाटील म्हणाले, सत्ताधारी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असतानाही संसदेचे कामकाज  विरोधकांमुळे चालत नसल्याचा आरोप केला जातो.

विरोधकांचे अधिकारही काढून घेण्याचे काम केले जात असल्याने संविधानाची चेष्टा करण्याचा प्रकार   सुरू आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले,  नोटाबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ, गॅसची भाववाढ करून सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. सत्यजीत देशमुख म्हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा या दोन नेत्यांचे सरकार आहे. दोघांकडून वेगवेगळी राज्ये फोडण्याचे काम केले जात आहे. भाजपकडून जाती-जातीत, समाज-समाजात तेढ निर्माण केले.

जातीय सलोखा टिकविण्यासाठी काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. 2019 च्या निवडणुकीचे लक्ष्य ठेवून जिल्ह्यात काँग्रेस सशक्त करण्यासाठी आम्ही एकत्र बसून रणनीती आखणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  आंदोलनात ज्येष्ठनेते आमदार मोहनराव कदम, जयश्री पाटील,  जितेश कदम, माजी महापौर किशोर जामदार, प्रा. सिध्दार्थ जाधव,  दिनकर पाटील, संचालक अण्णासाहेब कोरे, विक्रम सावंत, राजीव मोरे, अमित पारेकर,  जितेंद्र पाटील,  के. डी. पाटील, वहिदा नायकवडी   उपस्थित होते. 
 

 

 

tags : Sangli,news,Center,state, BJP, government, protest,