होमपेज › Sangli › सांगली, आटपाडी बाजार समितीत ऑनलाईन सौदे

सांगली, आटपाडी बाजार समितीत ऑनलाईन सौदे

Published On: Jan 03 2018 1:17AM | Last Updated: Jan 02 2018 11:20PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगली  आणि आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन बाजार समित्यांची ऑनलाईन सौदे करण्याकरिता ई- नाम योजनेंतर्गत   निवड झाली आहे. त्यासाठी  प्रत्येकी 30 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

संकल्प ते सिद्धी - योगदान महाराष्ट्राचे : नवनिर्माण भारताचे 2017-2022 या उपक्रमांतर्गत   आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी   जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत,   निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, सहकार उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर   उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले,   सामान्य माणूस आणि बळीराजा यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध आहे. राज्य शासनाने त्यासाठी विविध कल्याणकारी योजना आखल्या आहेत.  सिंचन योजना, घरकुल योजना, कर्जमाफी, जलयुक्‍त शिवार अभियान, दिव्यांग मित्र अभियान, किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन, कौशल्य विकास योजनेतून मोफत प्रशिक्षण व रोजगार उपलब्धी अशा अनेक बाबींतून राज्य शासन सर्व स्तरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत   जिल्ह्यातून एकूण 1 लाख 86 हजार शेतकर्‍यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले.   त्यापैकी 78 हजार 540  शेतकर्‍यांना 168 कोटी 18 लाख 75 हजार 950 रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला .   अवर्षणप्रवण क्षेत्रातील   उपसा सिंचन योजनेसाठी   निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ते म्हणाले,  जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार   अभियानांतर्गत  मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गटशेती आदी अनेक कृषि विभागाच्या कल्याणकारी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.     वांग - मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे 100 टक्के पुनर्वसन झाले आहे.     जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी स्मार्ट ग्राम योजना राबवण्यात येत आहे.   कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून   2 हजार 592 उमेदवारांना विविध क्षेत्रात खाजगी व मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.