Tue, Jun 18, 2019 22:20होमपेज › Sangli › सांगलीच्या अंनिस कार्यकर्त्याला धमकी

सांगलीच्या अंनिस कार्यकर्त्याला धमकी

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 8:09PMसांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्र अंनिसचे सांगलीतील कार्यकर्ते राहुल थोरात यांना विशाल गोरडे या तरुणाने फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांना धमकी देऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असून, पोलिसांनी याचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे कार्यकारिणी सदस्य संजय बनसोडे व अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केली. 

ते म्हणाले, राहुल थोरात हे गेली अनेक वर्षे अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून सांगलीत काम करीत आहेत. मंगळवारी दुपारी विशाल गोरडे या तरुणाने फेसबुकवरून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची बदनामी करणारी पोस्ट केली होती. राहुल थोरात यांनी ही पोस्ट पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना टॅग करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर फेसबुकवर झालेल्या चर्चेत गोरडे याने राहुल थोरात यांना खानदान संपविण्याची धमकी दिली. तसेच 500 मराठा उभा करेन, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले. 

त्यानंतर थोरात यांनी याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार दाखल करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. बनसोडे म्हणाले, डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर आम्ही डगमगलो नाही. त्यांच्या खुन्यांना पकडण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करीत आहोत. त्याला पाच वर्षांनी यश मिळाले आहे. राहुल थोरात यांना धमकी मिळाली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. 

अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले, विशाल गोरडे या तरुणाने पोस्ट टाकताना मराठा क्रांती मोर्चा व मराठा वकिलांना उभे करू, असे म्हटले आहे. वास्तविक पाहता मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही कार्यकर्ता असे वक्‍तव्य करणार नाही. एकीकडे दाभोलकरांना बदनाम करायचे, मराठा क्रांती मोर्चालाही बदनाम करायचे आणि कार्यकर्त्यांनाही धमकी द्यायची असा उद्देश त्यांचा दिसत आहे. त्यामुळे धमकी देणार्‍या संबंधितावर तातडीने कारवाई करावी. यावेळी चंद्रकांत वंजाळे, रमेश माणगावे, ज्योती आदाटे, त्रिशला शहा, डॉ. लक्ष्मण शिंदे, प्रा. भिंगे, सुहास येरोडकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दहशतवादी राज्य घोषित करावे

डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, एटीएसने अटक केलेला राऊत हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या चौकशीतून आणखी 500 शूटरना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे शूटर जोपर्यंत पकडले जात नाहीत, तोपर्यंत पुरोगामी कार्यकर्त्यांना धोका आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्राला दहशतवादी राज्य  घोषित करावे. यामध्ये सनातन संस्थेचा हात असल्याचे दिसून येते. शिवप्रतिष्ठानचाही सहभाग पुढे येत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची झडती घेऊन दोन्ही संघटनांच्या नेत्यांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. राहुल थोरात यांना धमकी दिलेला विशाल गोरडे हा भाजपच्या सोशल मीडिया सेलचा मेंबर असल्याचे त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरुन  दिसून येते. त्यामुळे भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.