सांगली : वार्ताहर
अनिेकेत कोथळे खून खटल्यातील संशयित नसरुद्दीन मुल्ला याचा त्या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. प्रत्येक ठिकाणी तो उपस्थित होता. त्याला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणून तो तपास कामात अडथळे आणू शकतो, म्हणून त्याला जामीन देऊ नये, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी न्यायालयात केला.
कोथळे पोलिस कोठडीत असताना पोलिसांनी त्याला जबर मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील घाटात नेऊन जाळण्यात आला होता. या प्रकरणी निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, नसरुद्दीन मुल्ला यांच्यासह सात जणांवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सध्या सर्व संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. तिथून मुल्ला याने जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सरकार पक्षातर्फे आज युक्तीवाद करण्यात आला.
अॅड. निकम म्हणाले, हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा व सामाजिक स्वरुपाचा आहे. पोलिसच गुंडाप्रमाणे वागले आहेत. नसरुद्दीन याचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा सहभाग आहे. अनेक साक्षीदारांनी त्याला ओळखले आहे. त्याला जामीन दिल्यास तो तपास कामात अडथळे आणू शकतो. पळून जाऊ शकतो तसेच साक्षीदारावर दबाव आणू शकतो म्हणून त्याचा जामीन अर्ज मंजूर करू नये. आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला. या अर्जावर निर्णय 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, कामटे याचा मामे सासरा बाळासाहेब कांबळे याने न्यायालयाकडे यापूर्वीच अर्ज केला आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांचा कोणताही सहभाग नसून त्यांचे नाव या गुन्ह्यामधून वगळण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर युक्तीवाद करताना अॅड. निकम म्हणाले, कांबळे यांच्या या गुन्ह्यातील सहभागाबद्दल पुरेसे पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.