Wed, Nov 13, 2019 12:13होमपेज › Sangli › कामटेच्या मामेसासर्‍यास १४ दिवस कोठडी

कामटेच्या मामेसासर्‍यास १४ दिवस कोठडी

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:42AM

बुकमार्क करा

सांगली : वार्ताहर

अनिकेत कोथळे खूनप्रकरणातील संशयित आरोपी बाळासाहेब आप्पासाहेब कांबळे (वय 48, रा. सत्यविजय अपार्टमेंट, सांगली) याला 25 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती पी. पी. खापे यांनी मंगळवारी दिले. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ए. एस. पटेल यांनी काम पाहिले. 

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील सातवा संशयित बाळासाहेब कांबळे याला आज न्यायालयासमोर उभे करण्यात आले. सरकारपक्षातर्फे ए. एस. पटेल यांनी यावेळी युक्तीवाद केला. या गुन्ह्यामध्ये वापरलेले बुरखे, मोबाईल, दुचाकी गाडी, डीव्हीआर मशीन या वस्तू जप्त करायच्या आहेत. या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या दोन अनोळखी संशयितांना शोधून त्यांच्याकडे चौकशी करायची आहे. त्यामुळे बाळासाहेब याला चौदा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तीवाद पटेल यांनी केला. यावर न्यायालयाने 25 डिसेंबरपर्यंत कोठडी मंजूर केली.  बाळासाहेब कांबळे हा बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या पत्नीचा मामा  (मामे सासरा) आहे. 

वाटमारीच्या आरोपातून अनिकेत कोथळे व त्याच्या साथीदाराला सांगली शहर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्या दोन संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीत असताना युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी संगनमताने अनिकेतचा खून करुन त्याचा मृतदेह जाळल्याचा आरोप आहे. 

कोठडीतून बाहेर काढून अनिकेतला डीबी रुममध्ये नेण्यात आले होते. तेथे त्याला विवस्त्र करुन दोरीने उलटे टांगून अमानुष मारहाण करण्यात आली होती. पाण्याने भरलेल्या बादलीत उलटे डोक्यावर पडल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह सांगली शहरातून फिरवून आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळण्यात आला. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे व यंत्र नादुरुस्त करण्यात आले. कोथळे व त्याचा साथीदार कोठडीतून पळून गेल्याचा बनाव करण्यात आला. 

या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत सहा संशयितांना अटक केली असून सात पोलिसांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. ते सहा संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत (कळंबा कारागृह) येथे आहेत. सहा संशयितांच्या तपासादरम्यान अनिकेतचा मृतदेह जाळण्यासाठी बाळासाहेब कांबळे याने मदत केल्याचे निष्पन्न झाले होते.  आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.