Mon, Mar 25, 2019 02:48
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सांगलीच्‍या महापौरपदी भाजपच्‍या संगीता खोत

सांगलीच्‍या महापौरपदी भाजपच्‍या संगीता खोत

Published On: Aug 20 2018 12:54PM | Last Updated: Aug 20 2018 1:08PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज कुपवाड मनपा निवडणूक  निकालानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते महापौर व उपमहापौर निवडीकडे. या निवडी आज सकाळी पार पडल्‍या आहेत. सांगली महानगरपालिकेवर भाजपचा  झेंडा फडकला आहे. भाजपच्‍या संगीता खोत यांची सांगलीच्‍या महापौरपदी निवड झाली आहे. 

नव्या सभागृहात भाजपचे ४१ नगरसेवक असून अपक्ष गजानन मगदूम यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ३५ नगरसेवक आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे सर्व नगरसेवक गोव्याला सहलीसाठी गेले होते. सर्व पक्षांनी नगरसेवकांना व्हीप लागू केले होते.

भाजपकडून महापौरपदासाठी संगीता खोत आणि उपमहापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसकडून वर्षा अमर निंबाळकर यांनी महापौरपदासाठी तर स्वाती पारधी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते.

संगीता खोत यांना ४२ तर काँग्रेसच्या  वर्षा निंबाळकर यांना ३५ मते मिळाली आहेत. स्वाभिमानीचे विजय घाडगे तटस्थ आहेत.  सांगलीच्या उपमहापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी विजयी झाले आहेत. सूर्यवंशी यांना ४२ तर राष्ट्रवादीच्या  स्वाती पारधी यांना ३५ मते मिळाली आहेत.