Thu, Jul 18, 2019 06:26होमपेज › Sangli › भाजपच्या संगीता खोत महापौर; सूर्यवंशी उपमहापौर

भाजपच्या संगीता खोत महापौर; सूर्यवंशी उपमहापौर

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 11:29PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सौ. संगीता खोत आणि उपमहापौरपदी भाजपचेच धीरज सूर्यवंशी यांची बहुमताने निवड झाली. सोमवारी महापालिकेत निवडणूक निर्णय अधिकारी जि. प. चे मुख्य कार्यकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखालील विशेष महासभेत ही निवड करण्यात आली.

सौ. खोत यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांचा पराभव केला. त्यांना 42, तर सौ. निंबाळकर यांना 35 मते मिळाली. उपमहापौरपदी सूर्यवंशी यांना 42 आणि आघाडीच्या सौ. स्वाती पारधी यांना 35 मते मिळाली. स्वाभिमानी विकास आघाडीचे विजय घाडगे  दोन्ही निवडणुकांत तटस्थ राहिले. खोत, सूर्यवंशी यांच्या विजयाने महापालिकेत भाजप पर्वाला सुरुवात झाली.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने 78 पैकी 41 जागा मिळवून 20 वर्षांत पहिल्यांदाच सत्तापरिवर्तन घडविले होते. विरोधी काँग्रेसला 20, तर राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या. स्वाभिमानी विकास आघाडी व अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. अपक्ष उमेदवार गजानन मगदूम यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याने  पक्षाचे संख्याबळ 42 झाले आहे. या टर्मच्या पहिल्याच महापौर, उपमहापौरांची आज निवड  होती.

महापौरपद महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे.  भाजपकडून  या पदासाठी आठ नगरसेविका इच्छुक होत्या. परंतु भाजपने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (दि.16 ऑगस्ट) संगीता खोत व सविता मदने यांचे अर्ज दाखल केले होते. आघाडीच्यावतीने काँग्रेसच्या वर्षा निंबांळकर यांनी अर्ज दाखल केला होता. उपमहापौरपदासाठीही भाजपने धीरज सूर्यवंशी, पांडुरंग कोरे, तर आघाडीच्यावतीने सौ. पारधी यांचे अर्ज दाखल झाले होते.
आज सकाळी 11.30 वाजता अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष महासभा पार पडली. 

प्रारंभी महापौर निवड करण्यात आली. सौ. खोत, सौ. मदने आणि सौ. निंबाळकर या तिघींचेही अर्ज छाननीत वैध ठरले. सौ. मदने यांनी माघार घेतली. भाजपकडून सभागृह नेते युवराज बावडेकर यांनी निवड बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विनंती केली. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे खोत व निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली. सौ. खोत यांना 42 तर निंबाळकर यांना 35 मते मिळाली. सात मतांनी खोत महापौरपदी विजयी झाल्या. 

उमहापौर पदासाठीही धीरज सूर्यवंशी, कोरे व सौ. पारधी या तिघांचेही अर्ज वैध ठरले. भाजपकडून कोरे यांनी माघार घेतली. त्यामुळे सूर्यवंशी व सौ. पारधी याच्यात लढत झाली. सूर्यवंशी यांनाही 42 मते मिळाली. पारधी यांना 35 मते मिळाली. स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवकविजय घाडगे तटस्थ राहिले.

निवडीनंतर सभागृहात श्री. राऊत, आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी सौ. खोत, श्री. सूर्यवंशी यांचा निवडीबद्दल सत्कार केला. यावेळी नगरसचिव के. सी. हळिंगळे उपस्थित होते. 

भाजपच्या निकषातून भ्रष्टाचारमुक्‍त कारभार करू

महापौर सौ खोत, उपमहापौर सूर्यवंशी म्हणाले,  भाजपमुळे  आम्हाला पदाची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्‍त आणि गतिमान विकासाचा आदर्श घालून दिला आहे. त्यानुसार खासदार पाटील, आमदार  गाडगीळ, आमदार खाडे यांच्यासह कोअर कमिटीच्या नेतृत्वाखाली  महापालिकेत भ्रष्टाचारमुक्‍त, पारदर्शी कारभार करू. मुख्यमंत्र्यांनी पालिकेला शंभर कोटींचे अनुदान दिले आहे. यातून सांगली, मिरज व कुपवाड शहरांच्या समतोल विकासाचा प्रयत्न करू. 

काँग्रेस-राष्ट्रवादी एकसंधच; तुमचे 42 सांभाळा

राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान व काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील, मंगेश चव्हाण, वहिदा नायकवडी  यांनी निवडीनंतर भूमिका मांडली. ते म्हणाले, आघाडीने ही निवडणूक केवळ आम्ही एकसंध आहोत, हे दाखविण्यासाठीच लढविली. भाजपने आमच्यातील काही जण संपर्कात आहेत, अशा वावड्या उठविल्या होत्या; पण बहुमत असताना गोव्याला सहल काढायची गरजच काय होती? आम्ही यापुढेही 35 जण विरोधक म्हणून गैरकारभाराविरोधात आक्रमक राहू. विकासकामांना पाठबळ जरूर देऊ; पण भाजपने आमच्यात फोडाफोडीचा नाद सोडावा. स्वत:चे 42 सदस्य पाच वर्षे सांभाळावेत.