Sat, Jun 06, 2020 20:01होमपेज › Sangli › मिरजेत आगीत तंतुवाद्ये जळून खाक  

मिरजेत आगीत तंतुवाद्ये जळून खाक  

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 28 2018 12:52AMमिरज : शहर प्रतिनिधी 

येथील सतारमेकर गल्लीमधील संगम म्युझिकल शॉपीला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत हार्मोनियम, सतार, ढोल, तबला व अन्य साहित्य जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचे सांगण्यात आले. या आगीत तंतुवाद्यांचे सुमारे 53 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सराफ कट्टा रस्त्याजवळ अण्णाबुवा मंदिर आहे. या मंदिरालगत रियाज अहमद अब्दुल कादर सतारमेकर व इम्तियाज अहमद अब्दुल कादर सतारमेकर यांची स्वरसंगम म्युझिकल शॉपी आहे. आज दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास या म्युझिकल शॉपीच्या वरच्या मजल्यावर आग लागली. या शॉपीमध्ये ढोल, तबला, सतार, हार्मोनियम व लाकडी साहित्य होते. त्यामुळे या साहित्याने लगेच पेट घेतला. 

शॉपीच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याचे समजताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाच्या एकूण सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत शॉपीच्या वरच्या मजल्यावर लागलेली आग खाली लागली. अग्निशमन दलाचे फायर अधिकारी चिंतामणी कांबळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी  आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या सात गाड्यांच्या बावीस खेपा करण्यात आल्या. सुमारे दोन तास ही आग विझवण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी महापौर हारुण शिकलगार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संभाजी मेथे उपस्थित होते. याबाबत सतारमेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.