Fri, Jan 18, 2019 12:54होमपेज › Sangli › सांगलीत स्वाभिमानी पोलिसांच्यात झटापट

सांगलीत स्वाभिमानी पोलिसांच्यात झटापट

Published On: May 10 2018 6:22PM | Last Updated: May 10 2018 6:22PM                                                                                                                                   
सांगली : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी कार्याकर्त्यांना गेटवरच आढवले. यामुळे संतप्त झालेले  कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. शेतकर्‍यांची बिले वेळेवर न देणार्‍या साखर कारखानदारांना पायघड्या घालता आणि आंम्हाला कशासाठी आडवता, असा जाब विचारत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. 

दरम्यान मागण्याचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याकडे देण्यात आले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, युवा नेते संदीप राजोबा, महावीर पाटील , जिल्हा परिषद सदस्या सुरेखा आडमुठे संजय बेले आदी उपस्थित होते. 

दूध दरवाढ, उसाची थकीत बिले आणि शेतकरी प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन आदी  मागण्यासाठी स्वाभिमानीतर्फे आज मोर्चाचे आयेजन केले होते.  विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. हातात ऊस, दूधाच्या किटल्या घेऊन मोर्चा निघाला. खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा फोटो असलेला डिजीटल फलक मोर्चात होता. भर उन्हात दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. पोलिसांनी तो अडवला. कारखानदारांना पायघड्या घालता.  आम्हाला मात्र आडवता. आत सोडा, अधिकार्‍यांशी थेट चर्चा करायची आहे, अशी मागणी केली. पोलिसांनी त्याला नकार दिल्याने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. अडवणूक केल्याचा आरोप करत दूध ओतले. काही कार्यकर्त्यांनी सांगली- मिरज रस्ता आडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्वांची समजूत काढली. 

संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी चव्हाण यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अनेक कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.   

शेतकर्‍यांच्या शेतीमालास भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. सध्या पाण्याचा प्रती लिटरचा दर वीस रूपये आहे. तेवढा दरही शेतकर्‍यांच्या दूधाला मिळत नाही. साडेतीन फॅट दूधाला प्रती लिटरला केवळ सतरा रुपये मिळत आहेत. हा दर किमान 27 रूपये मिळायला हवा. दर न देणार्‍या सहकारी दूध संस्थावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली. त्यावर चव्हाण यांनी तुमच्या प्रश्‍नात लक्ष घालतो, असे आश्‍वासन दिले. 

त्यांनी निवेदनात म्हंटले आहे, ऊस उत्पादक शेतकर्‍यांची बिकट अवस्था  आहे. कोणत्याही साखर कारखान्याने  एफआरपी प्रमाणे बिल दिलेले नाही. साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात असतानाही पाकिस्तानातून साखर आयात करण्यात आली. त्याचा फटका बसला आहे. आता सरकारने जाहीर केलेली मदतही तुटपुंजी आहे. कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकर्‍यांना झालेला नाही. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे  शेतकरी अडचणीत आला आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात .