सांगली : फुलं टाकली बांधावर, टाकण्याची मजुरीही अंगावर 

Last Updated: Apr 01 2020 8:13PM
Responsive image


लिंगनूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. यातून फक्त जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. विविध प्रकारची फुले ही शेतीमालामध्येच येत असली तरी, फुलांची विक्री मात्र जवळपास पूर्णतः घटली आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून बिजली, गलांडा, झेंडू या फुलांचा 14 एप्रिल नंतर दोन महिने प्लॉट टिकू शकेल, अशी आशा बाळगून फुले तोडून बांधावर टाकण्याची वेळ आली आहे.

लिंगनूर येथील युवा फूल उत्पादक शेतकरी सतीश मगदुम या शेतकऱ्याने दै. पुढारीशी बोलताना सांगितले की, मागील काही महिन्यांपासून दररोज 100 ते 150 किलो फुले मिरज ते सांगली आणि अन्य मार्केटमध्ये पाठवायचे. मात्र कोरोना आपत्तीमुळे फुल मार्केट गेल्‍या 15 दिवस झाले बंद आहे. त्यामुळे बिजली, गलांडा व झेंडू ही फुले तोडून बांधावर टाकावी लागत आहेत. या फुलांना 30 ते 40 रूपये दर मिळत होता. त्यामुळे महिन्याला एक लाख रूपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र मागील पंधरा दिवसांत विक्री ठप्प असून, फुले तोडून बांधावर टाकण्यासाठी दररोज चार मजूर लावले आहेत. त्यांचा दररोज हजार रुपये अतिरिक्त खर्च अंगावर येत आहे. त्‍यामुळे उत्पन्न गेले कोरोनाच्या खाईत अन मजुरीही आली अंगावर अशी गत होऊन बसली आहे.

१४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्‍याने यानंतर पुन्हा मार्केट सुरू होईल. तेव्हा पुन्हा फुलांची विक्री होईल या आशेवर शेतकरी आहे. त्‍यातूनच  फुले तोडली नाहीत तर पूर्ण रोप खराब होण्याची शक्‍यता आहे. म्हणून फुले तोडून टाकली जात आहेत. मात्र लॉकडाऊनची तारीख पुढे वाढवली तर मात्र पूर्ण प्लॉट सोडावा लागणार आहे, असेही मगदुम यांनी सांगितले.