चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

Last Updated: Jun 03 2020 7:10PM
Responsive image


वारणावती : पुढारी वृत्तसेवा

चांदोली धरण परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून, सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासांत तब्बल 75 मिलिमीटर पाऊस होऊन अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शासकीय नियमानुसार चोवीस तासात 65 मिलिमीटर पाऊस पडल्‍यास अतिवृष्टीची नोंद होते. आज अवघ्या आठ तासांतच हा टप्पा पावसाने ओलांडला आहे.  यंदाच्या पावसाळ्यातील ही पहिलीच अतिवृष्टी असून, आजअखेर 120 मिलिमीटर पावसाची तेथे नोंद झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून चांदोली परिसरात पावसाची हजेरी आहे. आज सकाळपासून मात्र पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. दुपारी दोन ते चारच्या दरम्यान वाऱ्याचा वेग वाढला होता. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. मात्र सुदैवाने कोठेही वित्तहानी झालेली नाही.

चांदोली धरणात सध्या 4.50 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून, पाणीपातळी 597.75 मीटर इतकी आहे. धरणाची पाणी पातळी खालावल्यामुळे वीज निर्मितीही बंद आहे. त्यामुळे धरणातील विसर्गही पूर्णता बंद आहे. हा पाऊस धुळवाफेवर पेरणी केलेल्या भात पिकासाठी उपयुक्त आहे, मात्र हातातोंडाला आलेल्या आंबा पिकासाठी हा पाऊस मारक ठरला आहे.