होमपेज › Sangli › वाळूटंचाईने बांधकाम व्यवसाय ठप्प

वाळूटंचाईने बांधकाम व्यवसाय ठप्प

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 10:38PM

बुकमार्क करा

कडेगाव : रजाअली पिरजादे

वाळू टंचाईमुळे तालुक्यात बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.  शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेकडो बांधकामे ठप्प झाली आहेत. यावर पर्यायी उपाययोजना करण्याची गरज आहे.

तालुक्यात येरळा नदीतील वाळू बांधकामाला उत्कृष्ट समजली जाते. परंतु मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपशामुळे येरळा नदीचे आस्तित्व धोक्यात आले आहे. त्यासाठी वाळू उपसा पूर्ण बंद करण्यात आला आहे. त्याचा मोठा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसला आहे. तालुक्यातील शेकडो बांधकामे बंद असून यावर उपजीविका करणार्‍या   कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.  चालू स्थितीतील बांधकामे अर्धवट अवस्थेत बंद पडल्याने बांधकामासाठी जुळवून ठेवलेले लोकांचे बजेट कोलमडले आहे. 

येरळा काठची वाळू ही सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात बांधकामासाठी प्रसिध्द आहे.  तसेच कृष्णाकाठ आणि पंचगंगा नदीकाठ वाळूचे आगार समजला जातो. अनेक वर्ष या नद्यांतून  अविरत बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. अशा उपशामुळे अनेकजण गब्बर झाले आहेत. वाळू तस्करीत  गुन्हेगारांचाही शिरकाव झालेला दिसतो.

वाळू भरपूर मिळू लागल्याने बांधकाम व्यवसाय चांगलाच फोफावला होता. या दुष्काळग्रस्त भागातही गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने  प्रदूषण नियंत्रण खात्यानेही वाळू उपशावर बंदी करण्याचे धोरण अवलंबले आहे. साहजिकच चारही बाजूंनी वाळू उपशावर बंदी आल्याने बांधकाम व्यवसाय चांगलाच अडचणीत आला आहे. स्थानिक तसेच परराज्यातून आलेल्या शेकडो मजुरांचे हाल होत आहेत. सध्या  उपसा बंद असल्याने वाळूचे दर आकाशाला भिडले आहेत. दगडाचे ग्रीड बांधकामाला चालते परंतु गिलावा व अन्य महत्वाच्या कामासाठी वाळूची गरज असते.

तात्काळ उपाययोजना करा

शेतकरी संघटनेचे नेते युनूस पटेल म्हणाले, गोरगरीब शेतकरी व घरकुल योजनेतून ज्यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे, अशी सर्व कामे ठप्प झाली आहेत. या समस्येवर तात्काळ उपाय योजना करण्यात आली नाही तर शासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.