Sun, Jul 21, 2019 05:58होमपेज › Sangli › जत तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ 

जत तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ 

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 10:08PMसांगली : प्रतिनिधी

जत तालुक्यात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला  आहे. उमदी, माडग्याळ, सुसलाद, सोनलगी, हळ्ळी, बालगाव, बेळूडंगी, संख, तिकोंडी,  अचकनळ्ळी यासह अन्य गावांत वाळूचा बेसुमार बेकायदा उपसा सुरू आहे. याला स्थानिक राजकारणी, महसूल व पोलिसांची साथ आहे. त्यामुळे मुजोर झालेले वाळू चोरटे पोलिस, महसूल पथकावर हल्ले करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. कहर म्हणजे ताब्यात घेतलेली वाहने पळवूून नेण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. 

वाळू उपसा बंदी केल्याने जिल्ह्यातील पश्‍चिम भागच्या अनेक तालुक्यातील चोरट्यांना चांगली दहशत बसली आहे. त्यामुळे पश्‍चिम भागातील वाळू उपसा बंद आहे. यामुळे तस्करांनी आपला मोर्चा भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या जत तालुक्याकडे वळविला आहे. काहीसा मागास असल्याने या तालुक्याकडे जिल्हा प्रशासनाचे फारसे लक्ष जात नाही, त्यामुळे चोरट्यांचे चांगले फावले आहे. तस्कर काही राजकीय मंडळींना हाताशी धरून बोर नदी पात्रातून  प्रचंड  वाळू उपसा करीत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी वाळूचे मोठे डेपो मारले आहेत. नदी पात्राची अक्षरश:  चाळण केली आहे.

वाळू उपसा रोखण्यासाठी काही गावातील विविध संघटना, राजकीय पक्ष, विविध पक्षांचेे कार्यकर्ते यांनी आंदोलने  केली. मात्र या आंदोलनाकडे महसूल व  पोलिस खात्याने दुर्लक्ष चालविले  आहे. प्रचंड तक्रारी वाढल्यानंतर महसूल विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली.  पण यामध्ये काही ‘चाणाक्ष’ महसूल कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला. त्यांना कारवाईसाठी विशेष अधिकार देण्यात आले. हे ‘चतुर’ कर्मचारी ‘चोरावर मोर’ निघाले. 

हे कर्मचारी कारवाईसाठी निघताना थेट वाळू तस्करांनाच फोन करून पथकाची ‘टीप’ देऊ लागले. यामुळे भरारी पथकाच्या हाती काहीच लागेना. काही वेळा हे भरारी पथक मुचंडी येथील ढाब्यामध्ये जेवणावर ताव मारूनच तपासणीसाठी जाते. याचे बिल कोणत्यातरी वाळू तस्कराच्या नावावर लावले जाते. याच दरम्यान येथून अनेक वाळूच्या गाड्या कर्नाटकात जातात.वाळू तस्करीमुळे अनेकजण रंकाचे राव झाले आहेत. पवनचक्क्यांसाठी वाळू  पुरविणारा तस्कर पुन्हा मोकाट सुटला आहे. तो रात्रं-दिवस बेकायदा वाळू उपसा करीत आहे. याकडे महसूल विभागाचे साफ  दुर्लक्ष आहे. काही दिवसांपुर्वी याने   तहसीलदार कार्यालयाच्या आवारात कारवाई करुन लावलेली वाहने गायब केली आहेत.  कहर म्हणजे  यानेच पोलिस ठाण्यात ट्रक चोरीस गेल्याची फिर्याद दिल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्‍त होेत आहे. साधी दुचाकी सायकल नसणार्‍या या तस्कराने  पवनचक्क्यांसाठी  वाळू तस्करी करून कोट्यवधी रूपयांची कमाई केली आहे. 

तसेच एक कोतवाल चांगलाच शिरजोर बनला आहे.  हा कोतवाल कारवाईसाठी पकडलेल्या  गाड्यांमधील  ब्रास व किंमत करण्यासाठी आपला हिस्सा बाजूला राखूनच वेगळी दंड आकारणी करतो. या कोतवालाने एका प्रकरणात गाड्या सोडविण्यासाठी मोठी कमाई केली आहे.  सध्या या कोतवालास ‘नैवेद्य’ दाखविल्याशिवाय वाळू तस्करी करता येत नाही.  याने जतमध्ये 20 ते 25 लाखांचा अलिशान बंगला बांधला आहे. सांगली येथील काही आजी -माजी नगरसेवकही  या व्यवसायात गुंतल्याचे समोर येत आहे. दररोज सांगलीला 20 हून अधिक डंपर जत आणि कवठेमहांकाळ  हद्दीतून पाठविले जात आहेत.