Wed, Jun 26, 2019 17:46होमपेज › Sangli › दंगलखोरांकडून भरपाई घ्या

दंगलखोरांकडून भरपाई घ्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदवेळी संपूर्ण राज्यात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे  97 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडूनच वसूल करण्यात यावी. ती भरपाई शासनाने भरू नये. शिवाय, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी जोरदार मागणी करीत हजारो समर्थकांनी बुधवारी सांगलीत मोर्चा काढला. 

यावेळी भिडे यांच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी भिडे यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनामुळे बंद झाला होता. त्यामुळे त्यावेळी झालेल्या दंगलीप्रकरणी  आंबेडकर यांच्यासह सर्व जबाबदार व्यक्तींवर  गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी आदी मागण्यांसाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी सांगलीत मोर्चा काढण्यात आला. 

कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून दुपारी बाराच्या सुमारास या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्येयमंत्र झाल्यानंतर मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. 

मोर्चाच्या अग्रभागी भगवा ध्वज,  त्यामागे महिला, युवती व त्यामागे धारकरी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. कर्मवीर चौकातून मोर्चा सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय,  भिडे गुरूजींवरील गुन्हे मागे घ्या अशा घोषणा देत मोर्चा पुढे सरकला. राम मंदीर चौक, काँग्रेस भवन, आझाद चौकमार्गे स्टेशन चौकात मोर्चा नेण्यात आला. स्टेशन चौकात मोर्चा आल्यानंतर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

तेथे प्रथम शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी प्रेरणामंत्र दिला. यावेळी मिलिंद तानवडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यवाह नितीन चौगुले यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. त्यानंतर ध्येयमंत्र झाला. बाळासाहेब बेडगे यांनी आभार मानले.

या मोर्चात प. पू. तेजोमयानंद स्वामी (विजयपूर, कर्नाटक), प. पू. शिवदेव स्वामीजी (गुरूदेव तपोवन, टाकळी-बोलवाड), योगानंद स्वामीजी (गुरुदेव आश्रम, चडचण), प. प. यतेश्‍वर आनंद स्वामीजी (गुरुदेव आश्रम, कागवाड), शिवयोगी राचय्या स्वामी, ज्येष्ठ नेते बापूसाहेब पुजारी, भाजपचे नेते मकरंद देशपांडे, माजी उपमहापौर शेखर इनामदार, गजेेंद्र कल्लोळी, नगरसेवक युवराज बावडेकर, युवराज गायकवाड, रावसाहेब घेवारे, शिवसेनेचे नेते बजरंग पाटील, दिगंबर जाधव, विजय हाबळे, नगरसेवक पांडुरंग कोरे, कर्नल टी. पी. त्यागी, कर्नल एस. पी. सिन्हा, माजी आमदार नितीन शिंदे, देवा गायकवाड, हणमंत पवार, हरिदास पडळकर, सुब्राव मद्रासी, लक्ष्मण नवलाई, अमित करमुसे, हेमांगी बापट, अनुराधा बोळाज, सुनीता मोरे आदींसह मान्यवर मोर्चात सहभागी झाले होते. 

शिष्टमंडळाकडून निवेदन

शिवप्रतिष्ठानच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष रावसाहेब देसाई, बाळासाहेब बेडगे, शशिकांत हजारे, राजू बावडेकर, प्रदीप बाफना, शशिकांत नागे, धनंजय मद्वाण्णा आदी उपस्थित होते. 

संभाजी भिडे यांचा मोर्चात सहभाग नाही...

ज्यांच्या सन्मानार्थ आणि समर्थनार्थ हा महामोर्चा काढण्यात आला. ते संभाजी भिडे मात्र या मोर्चात सहभागी झाले नव्हते. ते परगावी गेल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत शिवप्रतिष्ठानने केलेले हे आंदोलन त्याच शिस्तीत पार पडले. 

 

Tags : sangli, sangli news, Sambhaji Bhide, Support Rally,


  •