Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Sangli › उद्याच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळेल

उद्याच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळेल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ  बुधवारी काढण्यात येणार्‍या सन्मान महामोर्चाला संपूर्ण जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळेल, असा दावा कार्यवाह नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केला. आतापर्यंत 48 संघटनांसह विविध पक्षांनी मोर्चाला पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

चौगुले म्हणाले, कोरेगाव-भीमा येथील दंगलीबाबत भिडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातून त्यांना दोषमुक्त करून शासनाने त्यांचा सन्मान करावा, अशी आमची मागणी आहे. त्याशिवाय तेथील दंगलीत ठार झालेल्या राहुल फटांगडेच्या मारेकर्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. दि. 3 जानेवारीच्या बंदवेळी सांगलीसह राज्यात झालेल्या तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकर  यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशाही आमच्या मागण्या आहेत. 

चौगुले म्हणाले, भिडे यांच्या सन्मानार्थ राज्यात तसेच गोवा, बेळगाव, विजापूर आदि ठिकाणीही सन्मान महामोर्चा काढण्यात येणार आहे. सांगलीतील मोर्चा बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पुष्पराज चौकातून सुरू होईल. राम मंदीर चौक, काँग्रेस भवन, आझाद चौक मार्गे स्टेशन चौकात या मोर्चाची सांगता होणार आहे. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चाच्या सांगतेवेळी कोणाचीही भाषणे होणार नाहीत. केवळ निवेदन वाचन करण्यात येईल.

छिंदम प्रकऱणातही निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठान आघाडीवर होते. असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. या सन्मान मोर्चासाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय विविध 48 हून अधिक संघटनांनी पाठिंब्याचे  पत्रही दिले आहे, असे  चौगुले यांनी सांगितले. यावेळी अविनाश सावंत, अमित करमुसे उपस्थित होते. 

फेसबुकवर डॉ. आंबेडकर यांच्याविषयी पोस्ट टाकलेल्या रावसाहेब पाटील यांचा शिवप्रतिष्ठानशी कसलाही संबंध नसल्याचेही चौगुले यांनी यावेळी सांगितले. 

अशी आहे पार्किंग व्यवस्था

या सन्मान महामोर्चासाठी जिल्ह्यातून शेकडो लोक येणार आहेत. त्यांच्यासाठी नेमिनाथनगर येथील कल्पद्रूम मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, इमॅन्युअल इंग्लिश स्कूलचे मैदान येथे चारचाकी गाड्यांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. शिवाय संपूर्ण शंभर फुटी रस्त्यावर एका बाजूला पार्किंगची सोय करण्यात आल्याचे चौगुले यांनी सांगितले. 


  •